Sunday, March 22, 2026

जातं



जात्यावर म्हण सखे
काळजाचे गाणे
टाक एकामाग एक
स्वप्न भरून मूठीने

जोड एक एक शब्द 
पिठ हळूने पडेल
घामभिजला पदर
मुक्याने रडेल

सूपातले सारे
जरी येईल जात्यात
हंबर असू दे
भुकेल्या नात्यात

उगवेल दिस
हसेल दूरडी
कोण्या जोगत्याची
मग भरेल परडी!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com








कवड्याचा खेळ



जटा बांधतो बैरागी
मांडे कवड्याचा खेळ
नाही लागे तरी त्याला
कुंडलिनीचा बघ तळ

कोण अज्ञात दिशेची
तो साधना मांडतो
कमंडलूतील तीर्थ 
तो धरेला सांडतो

थकतो भागतो
तो दिगंत पाहतो
फूल होवूनी स्वतः
तो पिंडीला वाहतो!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com











Saturday, March 21, 2026

स्वप्नभंगाचा यमक






माझ्या कवितेचा सखे
तू नको तोडू तंतू
आणी नको तुझ्या 
मनी किंतू परंतू

ही भावनेची मंत्रधून 
मी रोज करे धावा
ही लेप संजिवनी
शांतावतो गर्त घावा

स्वप्नभंगाचा यमक
मी साधतो सरळ 
माझ्या दुःखाची बाई 
तूला भलती भूरळ!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




होईन मी तारा....



चाललो सखे मी, दूर अनवाणी
उरात माझिया, किती किती आठवणी
 
झाड पळसाचे बाई,त्याला बघ आग
लाल घडणीचा सुर्य,आणतो ना धग
मी करतो हाकांची, दिर्घ साठवणी...
चाललो सखे मी दूर अनवाणी
 
होता जागता चांदवा,चांदण्याची कुजबुज
तू राखून ही होती, माझ्या स्वप्नांची बूज
अनाहूत सखे तू केली पाठवणी.....
चाललो सखे मी दूर अनवाणी
 
गाठेण अज्ञात,शोधेनही दिशा
ध्रुव ता-यालाही देईन मी तूझी आशा
जिकरीने टाळेन आभासांच्या दाटवणी
चाललो सखे मी दूर अनवाणी....
 
 
दारी तूझ्या सखे पडो मंजिरीची भूल
मी होईन देवाला तू वाहिलेले फूल
कर माझ्यासवे आता तूझ्या सुखाची आळवणी
चाललो सखे मी दूर अनवाणी....
 
होईन मी तारा,कुठे तूटून पडेन
तू मागीतले स्वप्न,तस्सेच घडेन!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



कूंजणीचा विलाप



ढग काळे काळे पाहुन चुकला
कुंज पाखरी थवा
कुठल्या युद्ध भुमिची ही
मरण भयाची हवा
 
आला वसंत म्हणुनी येथे 
परतुन निघाले घरा 
शांत मनाने कुणी चेतवली 
ही सुख शांतिची धरा?
 
चुकतात आस्मानी रस्ते अन्
फुटतात थवेच्या थवे 
हं! शांतिसाठी युद्ध म्हणे !
पोकळ हे गवगवे
 
 
नुसतीच धरेवर नसते
आकांत भारली हाक
कुंजनीच्या टाहोलाही
ये वैधव्याची झाक!
 
शोधत राहते कुंजा
फिरते दिशा दाही
जिव तिचाही होतो
अलबत लाही- लाही
 
धरणीचा असा हा टाहो
आभाळाला  भिडतो
युद्धाच्या मग रणकुशीला 
हसरा बुद्ध रडतो!
 
ती शोधत कलेवर असते
तिच्या प्रिय सख्याचे
आभाळ दाटुन येते 
काळया गर्द धुक्याचे
 
ती  शोधते  धरेवर सारे
विध्वंस तिला हा दिसतो
दुर ढिगारी मलब्याच्या 
पंखाचा तुकडा दिसतो
 
 ती परतुन निघत नाही
ती अग्नीबाणा भिडते
सख्यास तिच्या भेटाया ती 
स्फोटा मधुनी उडते!
 
कोणास हवी ही शांती
जी मरणा आडुन येते
आणी जिवंत ऋतुच्या 
चैतन्या खुडुन नेते----

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com

इराण इस्त्रायल युध्दात वाट चूकणा-या आणी आपल्या जोडीदार गमावणा-या पाखरथव्यास अर्पण....कूंज पक्षी राजस्थानी लोकगीतातील प्रेमाचे प्रतीक असणारा आणी आयुष्यभर आपल्या जोडीदाराबरोबर एकनिष्ठ राहणारा आणी भारतात प्रतिवर्ष येणारा मध्य आशियातील पक्षी



माय मराठी कविता



माय मराठी कविता
गायवासराची जोडी
अंतःकरणी पाझरते
अमृताची गोडी!
 
ही जनीचा अभंग
ही मनीचा दूभंग
माय मराठीला माझ्या
सावळ्याचा तेजोरंग
 
ही हृदयाची वाणी
ही पेरणीची गाणी
ही काळ्या मातीतलं
पिक आबादाणी

शिवछाव्याची गर्जना
मावळ्यांची ललकारी
ही शाहिरी डफाची
लावणी अदाकारी
 
ही फुल्यांचा पोवाडा
ही तुकोबाची गाथा
जात्यावर राबणा-या
माझ्या माऊलीची व्यथा
 
ही पंचमीची गाणी
ही भिमगीत
म्हणी उखाण्यातून
ही शिकवते रित
 
ही ज्ञानयाची भाषा
बहिणाबाईचं पाखरू
हे मुकनायकाचे शब्द
जपण्या लेकरू
 
किती किती थोर
या माऊलीची छाया
पान्ह्यातून झरणारी
ही मुखातील माया!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



आपसूक



नको काढू सखे
मोरांचा माग
त्यांच्या पंखाना येईल 
मेघभरी जाग

ते होतील थेंब 
भूई करतील ओली
जिव दमून जाईल
मोजताना खोली

ओघळू दे त्यांना
हळू आपसूक
वेचतील त्यांना
प्रेमातील लोक

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




ठोकताळा



धुळीच्या ललाटा
कसा लावू पाय?
हंबरते गाय....
काळजातली 

झुरत्या फुलांची
मला येते कीव
सूकतो जिव
मनोमन

सरत्या दिनाची
तूला नसे जाण
एकांताची आण
काळजाला.....


नको असे टाकू
जसे उरकते पूजा
नसे कोणी दूजा
अर्चनेत

मला सखे आला
टाळण्याचा कंटाळा 
चूकतो ठोकताळा 
सदैव तूझा.....

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com






ढग



मी दृश्य ढग...तुझ्या 
फक्त अवकाशी असतो
स्पर्शिता जाणवत नाही
बहूधा असतो.. नसतो...

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com




रेतबनाची भिरभिर



नसते दिसत कोणा
मृगजळाचे झरणे
आणी मरूतळाला 
एकांत नदीचे मरणे

असते तरीही काळीज 
मरुद्यानी त्याचे हिरवे
वाळूवर कोणी जिप्सी
अश्रूंनी कविता गिरवे 

उठती अनंत वादळे
उडते भिरभिर रेती
सुप्तहाकांचे काफिले
रेतबनी भिरभिरती....

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com





Thursday, March 19, 2026

मुक्तीसंगर!



तूझ्या ओंजळीने भिमा
तू आम्हा दिलास सागर
महाडाच्या तळ्यातून 
तू चेतवला जागर!

तूझ्या ओंजळीचे आजही
आम्ही पितो रे पाणी
पिढ्या हूरूपाने गाती
तूझ्या संगराची गाणी

याचक ओंजळीला तू
दिला तृप्तीचा घोट
तू लेकरू कवटाळत्या
मायमाऊलीचे पोट !

महाड संगराच्या शतकपुर्ती वर्ष प्नारंभास नमन!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com



फूलदाणी



नकोस बोलू काही
पक्षी निघतील गावा
ऐकून घे तू स्तब्ध 
हृदयाचा रुणझुण पावा

पडू दे टिपटिप हलकी
पिंडीवर तू जलधारा
माळावर झरून येवो
चंद्रप्रकाशी वारा!

चैत्र असू दे हाती
पालवीस गाऊ दे गाणी
सजवून निघेन पुढे मी
ऋतूचक्राची फूलदाणी.

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com








भगवंचना!



शोधतो कोण कुळाचे 
मी बासरी सुराचे गाणे
राधे राधे निनाद येतो 
व्याकूळून मंद तराणे

धरू हाती लगाम की
जपू चक्र सूदर्शन ?
घनघोर युध्दस्थळी ही 
पुकारते वृंदावन 

देवू उपदेश कसला
स्वतःच व्याकुल असता
सारे मागे सोडून मी
होतो भगवन् हसता!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व 
www.prataprachana.blogspot.com





चैत्रोत्सव



चैत्रोत्सवात गूंजते
कोकिळाचे गाणे
झाड नेसते तनी
नवनवेलीची पाने

येतो पालवीला गंध
दारी अंब्याची डहाळी
झाक सृष्टीला सा-या
कोवळी कोवळी

मज सूचते अंतरी
गीत एक नवे
मी रचतो अवकाशी
हाकभारले थवे

जप थव्यांचे काळीज
तूझ्या फांदीवर थारा
दे चैत्राच्या पालवीला
वसंताचा वारा!

मी भारला पळस
मला कवितेचा घोस
नको परडीला तूझ्या
या शब्दांचा सोस!

₱Ɽ₳₮₳₱)
रचनापर्व
www.prataprachana.blogspot.com


मराठी नववर्षाभिनंदन!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!



अत्त दिप भव!

शाक्यमूनी तथागता! वैशाख पोर्णिमेस तू पद्मफूलावर पाय देत अवतरलास ! मात्र ! बूध्दत्व साधण्यासाठी तू धुंडाळलेस कितीतरी काटेरी मार्ग! निकराने नि...