Sunday, July 30, 2023

गाठीभेटी



झाड उभे दुर 
न होई दिठादिठी
खोल तळाशी तयांच्या
मुळांच्या गाठीभेटी...


"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
३०.७.२०२३






रुणझुण...


नभ आले गं शिवारा
कुठे तुझी हाक?
अंतरीच्या पावसाला
तुझ्या पापण्याची झाक

रान झाले गं हिरवे
तुझ्या असण्याचा रंग
माझ्या मनाच्या सुगीला
तुझ्या फुलव्याचा संग

कशी हालते राहुटी
एक एकली रानात
वारा आठवांचा काय
सांगतो कानात?

भिजतो पाचोळा बघ
मातीच्या थराखाली
थेंबाथेंबाने गाठतो
तो वापश्याची खोली

गंध साचतो अंबरी
तुझ्या तनाचा आभास
युगेयुगे पुढे चाले
माझ्या ढगांचा प्रवास 

कधी होशील आभाळ?
देण्या पावसाची खुण
मी मिठीला घेईन
तुझी थेंब रुणझुण.....
"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
३०.७.२०२३




  













Friday, July 28, 2023

आसेमागे.....



ओल्या आणाभाका
कशा येतील आकारा?
सये ! तुझ्या वेशीवरी
आडे मनाचा पुकारा

हुंदक्याच्या तळातून 
दे ना एक हाक!
मग शब्दांना येईल 
ओढाव्याची झाक

घे कुशिला मुक्याने
एक एक ओळ 
कविता सोसेल
दुराव्याचा काळ

तुझ्या आसेमागे
आस माझी धावे.....
कसे सुटेल हे कोडे?
नियतीला ठावे!

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२८.७.२०२३










हुरहूरे


घायाळ हरिण हसते
बाण तुझा कळवळतो
कसला गंध अनामिक 
करुणेचा दरवळतो?

पारध हवी कशाला
कवटाळत असता सुळ
जिव शिणून मंद होता 
का उठते गोरजधुळ?

मी हिरवे जंगल होऊन
किर्र तरी ना भासे
हे रानफूल गं कोणते
आत खोल सुवासे

मी निर्जन वाटेवरती
दिप कशाला पेटवू?
पक्षी पंखकूशिला
कशास त्यांना उठवू?

मी ऋतूंच्या सावलीला
आडोसा उन्हाचा धरे
पाऊस असा का तुझा
मुक्याने हुरहुरे......


"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२८.७.२०२३









 





Tuesday, July 25, 2023

ओथंब नाती


पाऊस असा का पडतो
जणू माय माऊली गाते
दुर अंतरी लेक जणू की
सासुरवाशीण होते

गर्त उमाळे रोखत चाले
गडद ढगांचा थवा
जात्यावरच्या ओवीमधूनी
हुंदक्याचा हो गवगवा 

बकूळगीतांची रास लावते
दुःख उगाळत माई
ओवी मधूनी प्रकट होते
नकळत मग अंगाई

ठेच लागते खसकन 
जिव असा कळवळतो
रक्तामधला खोल बंध 
परगावी तळमळतो

अंतःकरणातील हाक बघ
नदीत उमटून येते
सासुरवाशीण माई अन्
माय सासुरवाशीण होते

मिसळून जातो हुंदका
हिरवी होते माती
ढग चालतो पुढे
उजवत ओथंब नाती......

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२५.७.२०२३








Monday, July 24, 2023

हुरहूरणारे.......






देशांतर या नभांचे
शिखराला हळू भिडते
मृदेच्या हृदयकणात ओले 
स्वप्न बघ धडधडते 

हा झ-याचा शुष्क वळ
कडेकपारी का खुलतो?
दगडांच्या राकट डोळ्यातून 
बघ पाऊस का गलबलतो?

ती डोंगरवाट का रेखते
आभासी हिरवी रेषा?
काळ्या ढगास सुचताना
ओली पाऊस भाषा

घरटे का शाकारते
चिमण्यांना कसली घाई?
ढग वाहतो स्वप्न
होऊन तत्पर भोई

मी अथांग रिता होऊन
अदमास तुझा हेरतो
येशील तुडवत वाटा
माळरानी स्वप्न पेरतो

येतील हिरवे ऋतू
रंग ऊधळत सारे
मग गवसतील मलाही गीते
तुझे काळीज हुरहुरणारे...

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२४.७.२०२३










  



Sunday, July 23, 2023

ढगांची विण



ढग उसवते सजणी
काळजाची विण
सोसते कोण?
या ओल्या साजणकळा

आठव थेंबाखाली
रान होते चिंब
नयनी प्रतिबिंब 
हिरवे कोवळे

कोण गाते तृष्णेचे
कंच ओले गाणे
स्पर्शाची धुंद पाने
नव्याने फुटताना

कसले हिरवे शब्द 
धरेला फुटली
माहेरवाशीण कुठली
एकांती मोहरते

विज गं कशाला
आकांत करते
आभाळ झरते
मुकाट्याने.....

झेलू का अखंड 
हा मिलन सोहळा
कोंब आशेचा कोवळा
फुटताना......

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२४.७.२०२३









Friday, July 21, 2023

अधिर पिसारा


का थबकते बाई!
घनशामल पाऊस वेळी
गलबल्याच्या मुहुर्तावरती
कसली ब्रम्हानंदी टाळी?

कोण उसवते विण गं
मोरपिसारी इजा
आभाळ तुझे सोसते
झेलत राहते विजा

मी पाऊसघाई करतो
ओसरी तुझी की ओली
तु शोधुन खोदून घेशी
माझी स्पंदन खोली

काय हाताशी लागते
देशील कधी ईशारा?
मोर मनाचा माझा
त्याचा अधिर पिसारा.....
やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२२.७.२०२३






Tuesday, July 11, 2023

समाधिस्थ ढग


समाधिस्थ ढगांचे छत
हळुवार एकले गळते
चिंब पावसाखाली
मन असे का जळते?

अधि-या हवेत ओल्या
पर्वत कडा बघ भिजते!
दुर कपारी, नाले नद्यात
दुःख माझे सजते....

घनघोर हाकांचे तुषार 
उधळत गाठतील माती
चिखलाच्या फडताळातून
ते गीत तुझे का गाती?

कसे फुलते दुःख 
हिरवे,पिवळे,लाल
दे विसावा तृष्ण ओठा 
तुझा उन्नत भाल

मी लिन पावसामधल्या
वाहत्या एकट धारा
आकांत जणू विजेचा
कळवळून प्रकटणारा

येवू तुझ्या शिवारा?
सजवून घेशील माती?
फुलतील रानाशिवारी
कंच हिरवी नाती....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
१२.७.२०२३











Saturday, July 8, 2023

अभंग!


पाचोळा रे उडतो
जिव जणू कुणाचा
सुर अंतरी घुमतो
मीरेच्या विणेचा

पाय रे कुणाचा!
पडतो अनवाणी
हाकेस भेटते हाक
मुक कशी दिनवाणी

कलते आभाळ जरासे
चांदण्याचे तळवे
अंतरिक्ष होतो आत्मा
रंग चंदेरी हळवे

डाग नको ना काही
चंद्रनिशेच्या भाळी
निद्रेच्या फांदीला बघ
तुझी स्वप्नझोळी

येईल कधी संभवा
चांदण्याचा संग?
उमटेल आत्म्यावर या
शामल एक अभंग !

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
८.७.२०२३






 












रचनापर्व

Thursday, July 6, 2023

तिर्थात्मा....



सर कोसळे मंद
नभास न्हयाळताना
का येते नभ दाटून
पाऊस टाळताना?

येती कुठुन श्रमून
हे वनवासी थवे?
आणी तुझ्या अंगणी
शिंपडती ओल दुवे

घे थेंब तळहाती
तुषार सुध्दा धारुन
मी ढगातून पोहचे
अनंत दुरावे सारून

घावांचे विस्मरण तुला
होई नित्य पावसाळी
तरीही तुझ्या रानशिवारा
माझी ओलहिरवी हाळी

आहे ना तुझ्या शिवारी
माझ्या ढगांची माला?
उमजेल, पहा कणवेने
त्यांचा आत्मा तीर्थ झाला.....

やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
७.७.२०२३
















Saturday, July 1, 2023

शब्दांचा दरवेशी


असु दे एक कविता
तुझ्या काळजा पाशी
हरखून जाईल कोणी
शब्दांचा दरवेशी..!



やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२.७.२०२३


एकांत भ्रम


चंद्रसर का झरते?
पाऊसओल्या आकाशी
वाहे कोण गर्त गर्त
काळजाच्या मुळापाशी?

झिरमिर झिरमिर चाले
झुळुक हवेची ओली
मुक हाकात लिप्त
माझ्या लोकगीताची बोली

हाक कशी मी देवू?
नसता मजला मुभा
निरोप तुझा घेण्या 
नभी चंद्र ठेवला उभा

फरियाद या ढगांची
कोसळते तुझ्या दारी
मन चाले तुझ्या दिशेला
जणू मग्न आषाढ वारी

वाहत असता सारे
मी बनतो वृक्ष बिज
तुझ्या निशिगंधी झाडाला
अर्पत माझी निज

दुर विज कडाडे
ढग जणू की रडते
त्याच्या काळीज मुठीत
साद अनाम धडपडते

ये शिवारी ओल्या
तुडवत चिखलवाटा
ठरु दे अपवादाने
एकांत भ्रम हा खोटा....


やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२.७.२०२३




















राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...