Tuesday, July 25, 2023

ओथंब नाती


पाऊस असा का पडतो
जणू माय माऊली गाते
दुर अंतरी लेक जणू की
सासुरवाशीण होते

गर्त उमाळे रोखत चाले
गडद ढगांचा थवा
जात्यावरच्या ओवीमधूनी
हुंदक्याचा हो गवगवा 

बकूळगीतांची रास लावते
दुःख उगाळत माई
ओवी मधूनी प्रकट होते
नकळत मग अंगाई

ठेच लागते खसकन 
जिव असा कळवळतो
रक्तामधला खोल बंध 
परगावी तळमळतो

अंतःकरणातील हाक बघ
नदीत उमटून येते
सासुरवाशीण माई अन्
माय सासुरवाशीण होते

मिसळून जातो हुंदका
हिरवी होते माती
ढग चालतो पुढे
उजवत ओथंब नाती......

"やraτa प"
www.prataprachana.blogspot.com
२५.७.२०२३








No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...