Friday, October 27, 2023

डंख



काळजातले देणे माझे
तुला कधी ना कळून येते
फुल एकले फांदिवरचे
मंद हवेने छळून जाते

गंध असा हा दरवळ दरवळ
झुळुक अशी ही भान हरवे
तुझ्या दिशेचा रिता कोपरा
मनास माझ्या कशास झुरवे?

फांदी हिरवी दवात न्हाते
गवतफुलांचे अंग कोवळे
नभात माझ्या उधळून येती
स्वप्न तुझे बघ सोनसावळे

तरीही जाचे तुझे रितेपण
हिमनगाची निर्जन टोके
पानगळीचा ऋतू जणू हा
वाटत राहते ओकेबोके

चांद मलूल का होतो येथे ?
उगवत असता सकाळ ताजी
हो ना तुही मजसम व्याकुळ 
आणी माझ्या कुशीस राजी

धुंद होऊ दे जगणे सारे
हाकेस माझ्या पंख मिळू दे
किती जहरी तुझा दुरावा
डंख त्याचा तुला कळू दे

                          ("やraτa প")                           
www.prataprachana.blogspot.com
२७. १०.२०२३ 



 





No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...