स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 19: मी एके मी...!
पुर्वपरिक्षेचा निकाल आल्याच्या दुस-या दिवसा पासूनच मी मुख्यपरिक्षेच्या सखोल अभ्यासाला सुरूवात केली..काहीच माहिती नव्हती..सोबत अभ्यासाला कोणीच नव्हतं..जे करायचं ते स्वतःच करायचं..फक्त एक आत्मविश्वास होता " आपण मुख्यपरिक्षेचे पेपर चांगलेच लिहू"..निव्वळ या भरवशावर मी जिव ओतून अभ्यास करत होतो.पुर्व परीक्षेच्या क्लासला शिकवायला गेल्याने ब-यापैकी नाव झाले होते. खुप मुलांचे रिझल्ट आल्याने सगळ्यांची मागणी होती मी मुख्य परीक्षा पण शिकवावी.आणी लातुरात प्रथमच कल्पनेपेक्षा जास्त निकाल आले होते त्यामुळे सर्वांचा आत्मविश्वासही वाढला होता. मी मुख्यपरिक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवायला जाणे आणी अभ्यास करणे यात गढून गेलो होतो. आजही तो दिवस आठवतो, मी पहिल्यांदाच मुख्यपरिक्षेचे सामान्य अध्ययन हा विषय शिकवायला गेलो , वर्गात जातो तर वर्गात अनेक दिग्गज बसलेले, त्यात अनेक पोस्टहोल्डर पण होते..पण मैदान दिसले की जसे घोड्याला फुरफुरायला होते तसेच झाले..मी न दबून जाता शिकवायला सुरूवात केली..अगोदर सर्वांनी साधारणपणे प्रतिसाद द्यायला सुरूवात केली..काही सिनियर व अनुभवी मंडळी समोर असल्याने प्रश्न अथवा चर्चा करायची तरी पंचायत! पण मी ठामपणे व नाविन्यपूर्ण मुद्दे व मांडणी सह शिकवायला सुरुवात केली आणी वर्गात हळुहळु मग सिनीयर्सनी पण दाद दिली..त्यांच्या नोट्स मधे पाॅईंट्स व प्रेझेंटेशन चे मुद्दे अॅड करायला सुरूवात केली. माझा आत्मविश्वास खुप वाढला...सिनीयर्सनी लेक्चर संपल्यावर विशेषत्वाने कौतुक केले.
मी त्यांच्या मोठेपणाने भारावून गेलो आणी ही लय व दर्जा घसरणार नाही याची दक्षता घेण्याचे ठरवले.
दिवस पुरत नव्हते, प्रचंड वेगाने अचुक अभ्यास, मांडणीचे नविन मुद्दे व पद्धती, लिहिण्याची विशेष शैली व समर्पकता या धर्तीवर मी अभ्यास करत होतो..माहिती नव्हतं की माझा अभ्यास कुठल्या दिशेने जात आहे. तपासण्याचे काही साधन नव्हते. फक्त एक माहिती होतं आपण निव्वळ अॅव्हरेज लिहून येणार नाही..वाचन, नोट्स काढणे, त्याला विशीष्ठ सादरीकरण देणे, उत्तर रेखीव व भरदार होण्यासाठी त्यात माहिती व इतर कंटेंटचा ऊपयोग करणे असे चालले होते..मी अभ्यासाव्यतिरीक्त करावे असे काही नव्हते आणी असले तरी ती चंगळ परवडणारही नव्हती. मी अक्षरशः खपत होतो..रूमवर ही जाणे कमीच झाले होते..जेथे अभ्यासाला बसायचो तेथेच रात्री लोखंडी खुर्च्या एकमेकांना जोडून मी झोपायला लागलो..कारण ती इमारत एका टोकाला होती आणी त्या भागात साप असल्याने खाली झोपणे योग्य नव्हते.
एके दिवशी एकटाच अभ्यास करत बसलो होतो.अचानक संतोष गोरड सर , जे मला काॅलेजला सिनीयर होते, (सध्या तहसीलदार, तत्कालीन नायब तहसीलदार) ते मी अभ्यास करत असलेल्या ठिकाणी आले. त्यांना अरूण पोतदार यांना भेटायचे होते. कारण त्यांनी पुण्यात मिळून अभ्यास केला होता. त्यांनी विचारपूस केली..आणी मला विचारले "तु काय वाचत आहेस?" मी त्यांना सांगितले "सर, मी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत आहे". त्यांनी कौतुक केलं, आस्थेने विचारपूस केली आणी मी काय वाचत आहे हे त्यांनी पाहिले. मी त्यांना माझ्या नोट्स दाखवल्या,विचारलं सर, मी योग्य अभ्यास करत आहे का? त्यावर त्यांनी सगळं पाहिलं आणी मला म्हणाले" यु आर ऑन राईट ट्रॅक!!" त्यांनी खुप शुभेच्छा दिल्या , ते गेले , पण मला एक आत्मविश्वास आला मी जे करत आहे ते योग्य आहे..त्या हुरूपाने मी अभ्यास करत राहिलो.
मुख्यपरिक्षेच्या अनुषंगाने संदिप येत रहायचा, तो सांगत रहायचा, करत रहा ! होशील पास! .तांदळे सर कधी तरी यायचे..बोलणे व्हायचे. मी टिकून होतो. मुख्यपरिक्षेचे हाॅलटिकीट आले. लगबग सुरू झाले. आयुष्यात पहिल्यांदाच औरंगाबादला जायचे होते. एकीकडे अभ्यासाचा दबाव तर दुसरीकडे तेथे कोठे राहणार? किती पैसे लागतील याचे टेन्शन..कशीतरी जुळवाजुळव झाली पण दबाव होताच कारण तेच ! उसनवारी आणी तुटपुंजे पैसे! .संदिप पण तयार झाला मुख्यपरिक्षा देतो म्हणून. मी आणी संदिप जायचे ठरले. मी अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात होतो..अभ्यास पुर्ण झाला की नाही हे कळत नव्हते. पण तरीही एक गोष्ट होती जी टिकवून ठेवत होती..."मुख्यपरिक्षा नापास होईल असे कुठलेच कारण नाही, म्हणून आपण पास व्हायचेच, आणी त्या शिवाय आपल्याला पर्यायही नाही हा स्वतःला दिलेला शब्द "
औरंगाबादला जायच्या अगोदर गावी जावून आलो, आई वडीलांनी चांगली परिक्षा दे म्हणून सांगितले, मी एक जबाबदारीचं भान घेवून निघालो..दोन दिवस अगोदर जायचे ठरल्याप्रमाणे आम्ही औरंगाबादला गेलो. एका लाॅजवर मी आणी संदिप थांबलो. संदिप अस्वस्थ होता..मलाही दडपण आले होते. दोघेही रिव्हिजन करत होतो. एकमेकाचा आत्मविश्वास वाढवत होतो. आमचे परीक्षा केंद्र वेगवेगळे होते. पेपरच्या आदल्या रात्री झोप येत नव्हती. डोळ्यासमोर उद्याचा पेपर येत होता..परिक्षा येत होती....नुसती तगमग...आणी सरतेशेवटी ती रात्र सरली..सकाळी आम्ही निघालो आपापल्या दिशेने..... एकट्याने लढावे लागते ,आपली वाट आपणच चालावी लागते हे जाणवणार क्षण..मी निघालो..खुप दडपण, अनोळखीपण, एकटेपण यावर मात करण्याच्या धडपडीत केंद्रावर पोहचलो..तेथे चालणारी एक गंभीर लगबग पाहून मीही गंभीर झालो...कोणीही ओळखीचे नाही ठार एकटेपण...आणी मनात येणारी अस्वस्थता, घालमेल, उत्सुकता, मुख्यपरिक्षेला पोहचल्याचा आनंद, पेपर कसा येईल याचा तणाव... रिव्हिजन....विचार..काय काय सुरू होते..माहिती नाही.....बेल वाजली...मी वर्गाकडे निघालो..वर्गात पहिले पाऊल टाकले..आणी...मन भरून आलं..या टप्प्यापर्यंत येण्यासाठी झुंज दिलेला सारा काळ क्षणात मनात दाटून आला....स्वतःला आवरून मी बसलो..स्वतःला बजावलं ..स्वतःतील सर्वोत्तम द्यायची वेळ आहे भावनाशिल होवून चालणार नाही...
पेपर आला..मराठीचा पेपर...हात फुरफुरायला लागले...त्या भारावल्या क्षणात मी निबंध लिहायला घेतला.."साहित्य व समाज सुधारणा"...लिहीत गेलो..पुस्तके समाजाला कसे घडवतात..माझ्यासारखे कसे घडतात याचा अंश घेवून मी स्वैर लिहीत होतो..इंग्रजी, हिंदी, मराठी, भाषेतील साहित्य, लोकसाहित्य, अनुवादित साहित्य, समाज घडवलेल्या महान धुरीणीचे साहित्य ...मी लिहीत गेलो..पेपर सोपा गेला..परत आलो खुशीत होतो..संदिपला पण सांगितले, तु अवघड विषय निवडलास..फारच कमी पोरांनी हा विषय निवडला..पण काळजी करू नको अवघड विषय लिहिल्यास शक्यतो चांगले मार्क येतात..त्यात तु साहित्यिक भाषेत लिहीले आहेस चांगले मार्क मिळतील असे म्हणून त्याने आत्मविश्वास वाढवला..नंतर इंग्रजीचा पेपर दिला ...तो मात्र अवघड गेला टेन्शन आलं...पण त्याचा परिणाम पुढील पेपर वर होणार नाही याची काळजी घेतली. सामान्य अध्ययनचे पेपर संपले..मी सर्व पेपर सोडवत होतो..लिहीणे शिल्लक राहत नव्हते..सर्व प्रश्न अॅटेम्पट केल्याने आत्मविश्वास येत होता ..आता फक्त दोन ऐच्छिक विषयाचे पेपर होते..साधारणतः सहा दिवस परिक्षा शिल्लक होती..
आणी अचानक संदीपने सांगितले मी पुढचे पेपर देणार नाही..लातुरला परत जात आहे..धक्काच बसला..कसेतरी तगत होतो..एकमेकांना आधार देत होतो..हिम्मत ढासळू देत नव्हतो ..तर हे मधेच...मला दुहेरी टेन्शन आलं..परिक्षे बाबत एकटेपण तर आलेच होते..पण घेतलेली रूम , तीचे भाडे शेअर होत होते..आता अशा अचानक घटनेमुळे संकटंच आले होते..बोलता ही येत नव्हते...पण न बोलता ही कळेल असे जिगरी दोस्त असल्यानेच तर मी संकटांना तोंड देवू शकत होतो...संदिपने मला सांगितले, मी माझ्या मित्राला बोललो आहे, त्याचे क्वार्टर आहे तेथे तु शिफ्ट हो, सध्या त्याची पत्नी गेल्याने तो एकटाच आहे तुला व त्यालाही डिस्टर्ब होणार नाही...कारण तो सकाळी ऑफिसला निघुन जाईल तुला अभ्यास करता येईल....पण तरीही मी खुप अस्वस्थ झालो...औरंगाबाद मधे एकटेच अनोळखी ठिकाणी राहून राज्यसेवा मुख्यपरिक्षा द्यायची वेळ आली होती संदिपला शिव्या घालाव्या की त्याने परस्पर अडचण सोडवली म्हणून आभार मानावे कळत नव्हतं....तो लातुरला आला आणी मी त्याच्या मित्राकडे रहायला गेलो..एक अदृश्य हात पुन्हा मदतीला धावून आला होता...
मी माझ्यामुळे त्याच्या मित्राला काही त्रास होईल असे काही होवू नये याची काळजी घेवून तिथे अभ्यास करत होतो..आणि तो बिचाराही माझी तेवढीच काळजी घेत होता..मी अभ्यास व एकटेपणाचे दडपण काय असते याचा घेतलेला हा सर्वात भयानक अनुभव...त्या वर्षी बॅंकिंग हा विषय खुप जणांनी घेतला होता त्यापैकी मी एक तो पेपर झाला..ठिक गेला..लोकप्रशासन हा माझा दुसरा ऐच्छिक विषय होता दोनशे मार्कांच्या या पेपर साठी दोन उत्तर पत्रिका मिळायच्या शंभर शंभर मार्कांचे लोकप्रशासन व दुसरी व्यवस्थापन या विषयासाठी, हा विषय या कारणामुळे खुप कमीजण घ्यायचे..मी तो घेतला होता..पेपर चांगला सोडवले..एकंदरीत मुख्यपरिक्षा ही ठिकच्या पातळीपेक्षा खुप चांगली गेली होती..मी संदिपच्या मित्राचे आभार मानले.. एक मोठा टप्पा पुर्ण करून मी परत निघालो..
ज्या गाडीत मी होतो त्याच गाडीत मला काॅलेजला लोकप्रशासन शिकवणारे ठोंबरे सर ही भेटले, त्यांनी विचारपूस केली, पेपर पाहिले..सोपे पेपर आले होते ..व्हाल पास म्हणून शुभेच्छा दिल्या..मी आभार मानून माझ्या जागेवर बसलो..औरंगाबाद मागे पडत होतं..मी आजपावेतो या टप्प्यापर्यंत येण्यासाठी खुप खस्ता झेलल्या होत्या..रोज याच कारणाला घेवून मी दिनक्रम आखला होता. आता मुख्यपरिक्षा पार पडल्याने त्या दिनक्रमात बदल होणार होता..रोज जे करत होतो ते आता बदलावे लागणार होते..माहिती नव्हते काय होणार होते..मी ही विचाराची आणी येवू घातलेली अनिश्चितता झटकली..व निकालाच्या अनिश्चिततेत स्वप्नरंजन करू लागलो... गाडी धावत होती रात्र गडद होत चालली होती...आणी मी त्या अंधारात दुरवर दिसणा-या हर लुकलुकणा-या दिव्यात माझी प्रकाशवाट शोधत होतो.......(प्रताप)
(क्रमशः)