Tuesday, February 28, 2023

हाकांचे वारे....



माझ्या शब्दतळाची किरणे
कवितेचा हो चांदवा
नक्षत्र माझ्या भावनेचे
सखीच्या हनुवटी गोंदवा

कोण एकले पाखरु
भिरभिर पेरत उडते
तुझ्या वनाच्या फांदीखाली
हाक कुणाची रडते?

वसंत आहे उभा हाकेवर
तुजविन येईल सुना
चैत्र पालवी रेखत येईल 
तुझ्या आभासी खुणा

बहराची हिरवी खुण
तरीही गडद तुझे हे गोंदण
माझे सारे बहर तुला मी
देत असता आंदण.....

शब्दातला वसंत माझा
शोधतो तुझी फांदी
कोकीळ चोची धाडली
मी मनसुब्याची माझ्या नांदी

झाड तुझे तु सावर
धार बहर सारे
बिलगण्या तुला निघालेत
माझ्या हाकांचे वारे.....


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१.३.२०२३


 
 








 




Saturday, February 18, 2023

चौघडे....


बहु जाहले,खाक झाले
तुम्हासम नसे न कोणी
झुकल्या माना उन्नत होती
गाथा ही अभिमानी...

सिंह गरजता,रयत निर्भय 
सह्याद्रीस मानाचे धडे
स्पंदने माझ्या हृदयातली
होती सनई चौघडे...  

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१९.२.२०२३




Wednesday, February 15, 2023

उसंत


एकेक पान  हा वृक्ष
शिशीरास त्यागतो आहे
की नवबहर धारण्या
आशिष मागतो आहे?

मी ही अनावर वेळी
कुठली प्रार्थना गाऊ?
की चैत्र तुझा धारण्या
हुरहुरता शिशिर होऊ?

दे ना रंगीत काही!
वाटावा सारा वसंत
तगमगीच्या कातर वेळी
मिळो!हृदयास या उसंत...

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५.२.२०२३
PC #चांदणे




निज वाहिली.....


भिरभिरते आहे हवेवर
स्वप्न बावरे एकले
अभ्राखाली त्याच्या
त्याने चांदणे व्यापले

कोण दिशेला वाहे
ही हवा बावरी मंद
का मोहरुन येतो नभी
पर्णगळीचा गंध

ओंजळीत कसे झेलू
स्वप्नांचे काहूर बिज
का हवेत विरुन जाते
पापण्याआडची निज

आतल्या निर्झराची
अखंड वाहे धारा
किती जतावा प्रवाह
मनात हिंदोळणारा
देवळाच्या शिखरावरती
खुण कोणती राहिली
तुझ्या दिशेच्या स्वप्नास
माझी निज मी वाहिली.....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१५.२.२०२३











Tuesday, February 14, 2023

पक्षिमाळ...


दिशात साचून येता
रंग गुलाबी ओला
भाव तुझा अबोली
गझलेचा मतला झाला

शब्द असे दवांचे
पात्यावर बिलगुन बसले
गीत मला मिलनाचे
सिगल चोची दिसले

एकांत सागर तिरी
कोण देतसे हाक
एकट संध्या चेतवे
सूर्याची बुडती झाक

हाक तुझी का ओली
येते माझ्या दारी
ही कसली सुन्न घटिका
आकांत निनादणारी?

रंग गुलाबी सागरी
एकात्म तुजसवे झाला
हाकांचा सिगल थवा 
दिगंती मौन निघाला

थव्यांच्या छायेखाली
गाव माझे कंपते
पक्षिमाळ का कधी
अशी सहज संपते?


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१४.२.२०२३









Monday, February 13, 2023

पाउल वेडेपिसे.....


रानफुलांचे ऋतु सांडले
विस्तीर्ण माळरानी
हृदयास तयांच्या फुटते
गंधबासरी वाणी

तुडवत कोण येते
मिरवत नाजुक मिरास
तरीही माळ रचतो रंगीत 
पायतळी आरास

बोलते ना काही उणे
दुःख हसरे लेउन
हृदय माझे भरुन ये
स्मित फुलांचे पाहून 

मी वेचतो तयांच्या हाका
आणिक ते उसासे
का होते व्याकुळ थबकते
पाउल वेडेपिसे?


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१३.२.२०२३

 





 

 


Saturday, February 11, 2023

झुरण्या....


निरव यामिनी वेळ 
एकट उभी चांदणी
आठवांच्या चंद्रघडी
रित्या हाकांची बांधणी

रात तगमगे शांत
निजकुशीत सारे
आभाळ तोलून धरते
कंप पावते तारे

एक तारा लख्ख
उभा असा का राहे?
वाट जणु सजनाची
तन्मयतेने पाहे!

शुक्र उगवे अनाहूत
चांदणी व्यथा हरण्या
मी प्रकाश त्या दोहोंचा
कुशीस धरतो झुरण्या... 


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
११.२.२०२३

 




















Thursday, February 9, 2023

मोरणी....


सजनकांती वेळी
असता सारे बंद
अंतरात माझ्या का
तु दाटावे बेबंद?

अव्यक्त गीते अगणित 
माझे विरुन जाती
मुसाफिराची कवने हळवी
मुक झरुन जाती

दिशेस अज्ञाताच्या तो
उभारे तमाची लेणी
फुटते अव्यक्ताला मग
आदिम व्याकुळ वाणी

कंप त्या हाकांचे 
शब्दात हो पेरणी
पडल्या मोरपीसाला
बिलगे का मोरणी?

वाहती मंद हवा
होई का जडभारी?
अद्वैताचे आलाप का
आळवते एकतारी....? 

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
१०.२.२०२३

 








Wednesday, February 8, 2023

लोकगाणी....


चंद्र उगवला सजने 
कशास पेटवी दिवा?
फांदी तुझी पुकारे
सांजओढी शब्दथवा

कशास ओंजळ धरते?
प्रकाश पांगु दे जरा
नदी तुझी मागते
माझा शब्द झरा

वाहत निघती शब्द 
पदर तुझा की आडवा
कवितेस रे माझ्या!
तिची उराभेट घडवा 

थबकतील माझे शब्द 
होउन अनवाणी
सजनओठी बिलगुन
ते होतील लोकगाणी  

गाईल मुसाफिर कोणी
हळवे माझे गाणे
तुझ्या अंगणी शब्दथवा
टिपताना मुक दाणे......
  

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
९.२.२०२३


 





अत्तर बुधले









बुधले अत्तराचे ,हवेत कशास मजला 
गंध तुझा कस्तुरी,अंतरात असताना

सजदे इश्वराचे, नकोत मला ते काही
बंद पापण्याआड, तु लख्ख दिसताना

मी हात कशास उंचावू,मागण्या काही
सारे हव्यास माझे,तुच तु असताना

पाहु कशास शामल,आभाळ तमाचे
ओंजळीत माझ्या,तुझे चांदणे हसताना

दडशील किती, स्वतःआड उगाच तु
ठाव तुझ्या मनाचा,लागलेला असताना...


"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
८.२.२०२३












Monday, February 6, 2023

प्रलय....


होते का कातर कातर
सय तुझी दाटता?
मी शब्द कवेला घेतो
एकांत भय वाटता

झळ उन्हाची विझता
कविता माझी पेटते
भूमीत निजल्या सितेस
हाक जणु की फुटते

होते थेंब थेंब झरण्या
कवितेची पापण्या दाटी
वृत्ताचे हळवे रंग
सजती मग ललाटी

मी यमक शोधत नाही
न की शोधतो लय
शब्दात समेटत असतो
मी तुझे प्रलय.....

"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
६.२.२०२३



 







  
 


Sunday, February 5, 2023

भेटत नाही


हाक जरी आभासी
आत होई प्रस्तरभंग
शब्दातला भाव माझा
बनतो मग अभंग

काजव्याच्या पंखाखाली
मी शोधे उजेड वाटा
विव्हल फुल माझे
अलिंगते तिक्ष्ण काटा

कसले मंतर पेरत
ही हवा मंद वाहते?
साजनकुशी रिकामी
शामल संध्या पाहते

या याद उमाळया वेळी
तुझी आठवण दाटते
आकाश माझे व्याकुळ 
तारा होऊन तुटते

तुटत्या ता-याखाली 
माझी आस तुटत नाही
कोण अजाण हे अज्ञात
कळवळून भेटत नाही....
"やraτa प"
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
५.२.२०२३

 




 

 

 

 






Thursday, February 2, 2023

चंद्र पाहिला झुरताना....


चांदणरंगी सायंकाळी
मिलनघडीच्या कातरवेळी-2
वेळ अशी ही सरताना
चंद्र पाहिला झुरताना
मी..
चंद्र पाहिला झुरताना

          शब्द मुक्याने बोलत होते
          बंध मनाचे खुलत होते_2
          खुलणारे मन थांबले
          संध्याकाल हा सरताना
चंद्र पाहिला झुरताना
मी..
चंद्र पाहिला झुरताना

             हा मंद मंद चांदवा
             खुल्या आकाशी जळताना
             झाले नकळत सारे सारे
             सारे मनास कळताना _2
             भाव अनावर ओथंबलेले
             डोळे हे भरताना
चंद्र पाहिला झुरताना
मी..
चंद्र पाहिला झुरताना
     
                मुक्यामुक्याने झाले बोलून
                बंद नयनी सारे झेलून _2
                दाटून येते बावर संध्या
                तुझी आठवण करताना
चंद्र पाहिला झुरताना
मी..
चंद्र पाहिला झुरताना

                  रात पावले अलगद अलगद
                  सांज निळी ही मरुन जाते_2
                  क्षणभर मिळते उब तुझी
                  विलग तुलाही करुन जाते
                  मला पाहते तुझी नजर
                  तुझ्यामुळेच मरताना
चंद्र पाहिला झुरताना
मी..
चंद्र पाहिला झुरताना
 
                   निघून गेलीस रोज सारखे
                   शिल्लक माझे प्रेम राहिले_2
                   सोडलेस या वळणावर तु
                   जसे राऊळी फुल वाहिले
                   ओघळणारा थेंब हातावर
                   निसटून जातो धरताना
चंद्र पाहिला झुरताना
मी..
चंद्र पाहिला झुरताना

                   चांदणरंगी सायंकाळी
                   मिलनघडीच्या कातरवेळी-2
                   वेळ अशी ही सरताना
                   चंद्र पाहिला झुरताना
                   मी..
                   चंद्र पाहिला झुरताना
              °°°°प्रताप•••••

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा -2023 येथे दिनांक ४/२/२०२३ रोजी निमंत्रित कविता.

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...