Saturday, January 30, 2021

रेशीम खुणा.....

ते एकांतीतील दुवे
मनात खोल दाटले
पुन्हा हो तुझा आभास
क्षणास या वाटले...

देठ कसले फुल जपते
कशास बहराचे दान
मी उचलून घेतो अलगद
तुझ्या नजरेची आण

चंद्र तळात बुडला
लाटा थडीस भिडती
चकोराच्या काळजाला 
आठवणीची झडती

तुझ्या आत्म्याची विराणी
आभास तुझा बाधतो
आठवणीचा काळीजक्षण
मुहुर्त रातीचा साधतो

मुक खोडल्या शब्दांची
कविता गेली सांडून
मी खोल मनाचा चांद
दिला भाळी तुझ्या मांडून

लहरीवर स्वार पक्षी 
थवे निघाले दुर
रातीत कोण आळवे
मुरलीचे ओले सुर?

रातराणीच्या तनाला
तुझ्या श्वासांचा सुवास 
मनाच्या पाखराचा मग
तुझ्या दिशेला प्रवास 

कसली चाहूल लागे
तुला झोपल्या राती?
मिटल्या तुझ्या डोळ्यात 
उजळून येती वाती

कुस अलगद बदल
चंद्र होईल चांदणे
खिडकीस लगडून जाईल
स्पर्शिण्या तुझे गोंदणे 

अलगद मिठीत सावर
माझ्या मनाची पहाट
रेशीम खुणा उमटल्या
पाहून घे ललाट.....!
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
30/1/2021

Friday, January 29, 2021

मनास तिकडे बिलगे......

आठवणीच्या तमात
शब्दांचे पेटती दिवे
आसूस हंबर माथ्यावर 
ओठांचे आभासी थवे

या तमबिजाच्या हृदयी
प्रकाश कसला फाटे?
इथे व्याकुळ भिजले मन
नयनी तुझ्या का दाटे?

अंधाराची सावली
दिव्यास हात धरावा
ओंजळीत शिरला वारा
वातीस स्पर्शत फिरावा

दुरदेशी चंद्र निजतो
आभाळ इथे सजते
स्वप्नझडीच्या सरीत
मन कुणाचे भिजते?

मन बहरते आभास
जणू उगळले चंदन
तुझ्या व्याकुळ हृदयाचे
इथे उमटती स्पंदन

या नयनांना स्वप्नांचे 
तुझ्या अलिंगन पडे
मी शिंपत जातो रातीवर
अत्तराचे सुगंधी सडे

कुस बदलता चांदवा
अंधार हळवा होई
श्वासांच्या खुलत्या कळ्यांना 
बहराची कसली घाई?

हातास शब्द सुचती
कवितेची होई लागण
बंद पापण्या खाली
बहरून येई साजण

चंद्रफुलांचे फुलवे
चेह-यास तुझ्या बहर
ओठांनी टिपून घ्यावेत
हे व्याकुळतेचे प्रहर

निजल्या रात घडीला
वणवा आठवणीचा शिलगे
मन माझे व्याकुळ ईकडे
तुझ्या मनास तिकडे बिलगे....
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
29/1/2021

Thursday, January 28, 2021

चंद्रझडीच्या राती....

चंद्रझडीच्या राती
भिजे चांदणे ओले
मुक मनाशी माझ्या
मन तुझे का बोले?

साचल्या मनाचे
तुषार कसले येती?
मी उजवून घेतो नित्य
पावलात विखुरली माती

रात दाटल्यावेळी 
हाक कशाला द्यावी?
ओठास फुटावी माझ्या
तुझ्या आठवणींची ओवी

बंद पापण्या आड
तु कसला रंग भरला?
खोल ढगाच्या काळजात 
अलगद वारा शिरला

जाग्या तुझ्या पापण्या
अंधाराची ओली हाक ?
थरथरत्या बोटांना ये
माझ्या स्पर्शाची सूक्ष्म झाक

तळव्यास चांदवा भेटे
सोनेरी तुझा चेहरा
मी सावडून घेतो सा-या
आभासाच्या मोहरा

तुझे हाकारे घेवून
पारवा राती फिरतो
जिव कुणाचा राती
अलगद मुक झुरतो

हळुवार उघड खिडकी
येईल कळ्यांना जाग 
वारा शोधत येईल
तुझ्या तनूगंधाचा माग

चंद्र कुशीला असता
आभाळ कशास रूसते?
कोणाच्या हृदयात खोलवर
कोणाचे मन वसते?

या ओल्या रातसमयी
आसमंत भिजलेला
मी चंद्र तुझा पाहीला 
माझ्या मनात निजलेला...
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
28/1/2021

Thursday, January 21, 2021

शिशिराची पानगळ...

मनाच्या मामल्याचे
शब्द शांत मुके
मी वेचून घेतो ओंजळी
तुझ्यात बुडले धुके

शांत तळ्याच्या हृदयी
खळबळ कसली चाले?
काल वाहिल्या फुलांचे
मन निर्माल्याशी बोले

नावेस कसली घाई?
पाण्यास नसे उसंत
शिशीराच्या पानगळीला
बघ बाधला वसंत!

बहराच्या खोल मनाला
फुल कुठले लगडून गेले?
फांदीच्या सावलीला
रूप तळ्याचे ओले

खुल्या अवकाशाला
पाखरे देती आण
मी धारल्या वसंताला
दे बहराचे रंगीत दान

शुष्क फांदीवरले
मी जोजवतो तीक्ष्ण काटे
झडल्या पानांनाही मग
बहराचा हुरूप दाटे

मनास बोलत असतो
खोल तळ्याचा तळ
बहरून दे तू सांडली
शिशीराची पानगळ...
(प्रताप)
"रचनापर्व"
22/1/2021
www.prataprachana.blogspot.com











Wednesday, January 20, 2021

पाखरशाळा...

शब्द कशाला लिहू?
काळीज असता बोलके
घे वेचून भाव मनाचे
पिकले,फुलले, शेलके...

भाव कशाला वाहू?
मन ओथंब चिंब ओले
घे मोहर सारे ओंजळीत 
कवितेस बहरती फुले

धिर शब्दांना देई
मनात रूजले ढग
खिडकीच्या अंतरंगी
मेघ दाटले बघ!

हलकेच येईल धुके
आसमंत होईल धुसर
या ढगाच्या माथ्यावर
काळीजछाया पसर...

रान एकले उभे
झाड रोज झुरते
फांदिवर आठवणींची
पाखरशाळा भरते
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com

Monday, January 18, 2021

सांजभरल्या तळ्यावर...

मावळतीचा रवी रेंगाळे
उडे गोखुरांची धुळ
मी शोधी सायंकाळी 
चांदण्याचे चंद्रकुळ

सांजभारल्या तळ्यावर
मन भरते पाणी
माळ तुडवती पैंजण
होवून अनवाणी 

पाण्याच्या अंतरंगी
कसले तरंग उठती
गोठ्याच्या आडोशाला
ओले पान्हे फुटती

काट्यांना दाटे सलगी
फुलात जिव दडलेला
दुर भरकटे पतंग
अवकाशी उडलेला

ती तुटली फांदी गाते
बहराच्या व्याकुळ ओव्या
धुसर सावल्या फितुर
रातीवर जडते माया

तळे वाहवत नाही पाणी
भरण्या येईल कोणी
त्या विसरल्या घड्याला
फुटेल आठवणींची वाणी 

सांज दाटते रानी
झाडांना पडते भुल
फांदीवर मुक बसते
एक अबोल फुल

रस्ता हळुच निघतो
गावास नसते दिशा
तळ्यात विरघळून जाते
गर्द काजळी निशा

तळे हालत नाही 
निघून गेले घडे
माळ शिकतो नित्य
प्रतिक्षेचे धडे

घड्यास कसला दोष?
कधी भरले, कधी रिते
तळ्यास सुचती नित्य
कंच ओली प्रेमगीते....
(•प्रताप•)
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com 
18/1/2021

Sunday, January 17, 2021

खिडकीच्या तावदानावर..

अवकाशाच्या कुशीतुन
चंद्रकोर डोकावे
चकाकत्या आठवणींना
मग कोण कसे रोखावे?

रातीची रानसावली
झाकत जाते काया
सजत्या चांदणदिव्याचे
शृंगार जाती वाया

नेमाने रोज मी पाही
उगवतीची तारका
चंद्र माझा नजरेपरी
हो अंधार बिचारा पोरका

सय कसली दाटे हृदयी
कोण वेलीखाली उभे?
नुसता आभास फुलांना
फुलण्याचे मनसुबे

सजणाची ओढ जिवा
खिडकी ठार खुली
रात देई चकवा
चांदण्याच्या सांजभुली

घटीका तिळ तिळ तुटे
बोटांची गुंफण होई
श्वासाची चाले लय
नि:श्वासाची गुंफण घाई

रात सरता सरत नाही 
पहाट वेशीत रूसुन बसते
खिडकीच्या बिजागरीला
झुळुकीची साथ असते

स्वप्नाचे लामणदिवे
अलवार होती मंद
हवेस कसला येतो
वस्त्राचा धुंद सुगंध

नयनांना चकवा होई
स्वप्न पापण्यास बिलगे
पहाटेच्या काकड आरती
नंदादिप तो शिलगे

दुव्यांना सुटते एक 
व्याकुळ ओली भाषा
खिडकीच्या तावदानावर
दिसे पुसट एक रेषा.....
(•प्रताप•)
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com 
17/1/2021

Friday, January 15, 2021

व्याकुळतेचे धडे...

आठवणीच्या प्रहरी
साळुंक्याचे थवे
वाटत नाही तुला?
भेटायला हवे...

मनाचे मामलेच असे
निःशब्द...सारे मुके
पहाटेस झपाटे जसे 
गर्द सावळे धुके

आस रानी फिरते
दुरचे जंगल खिन्न
झाडाच्या फांदीवर
बहर रिकामे सुन्न 

आसवांच्या मोहल्ल्यात
पावलांचे येणे जाणे
मुरलीला भारत राही
राधेचे ओले गाणे

कशास नजर शोधे
हर ठिकाणी भिरभिर
का अनामिक उठते
मनात एक शिरशिर?

असुनही रीते
नसुनही भरलेले
ओंजळीतील फुले 
आठवगंधाने भारलेले

अवचित झुळुक जणू
तुझ्या आठवणीचा स्पर्श हलका
माळरानी पडला दगडही
हो एकांती सजीव बोलका

तु दुरचे एकांत बेट
पाण्याचा त्याला वेढा
जिव वल्हवे स्वप्न
कसला अतिव ओढा?

दिस भारला होतो
नजर होते रिक्त
शब्द घेवून हळवे
मी रचतो तुझे सुक्त

शब्दांचे अलिंगन माझ्या
तुझ्या नजरेस पडे
मी शिकवत असतो
 नजरेस व्याकुळतेचे धडे...
(•प्रताप•)
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com 
16/1/2021

सांडत्या शब्दांचे....

या हवेला आता 
वाचा फुटत नाही 
हवेच्या पदराचा तरी
गंध सुटत नाही 

दुरवर अवकाशी 
ढगांचे कळप गेले
इथे कुणाचे मन
ओथंबे...कंच ओले?

दुरदेशीची सारंगी
इकडे तरंग धाडी
अवकाशाला भिडे
पक्षाची विभक्त जोडी

हाक कुणाची कोणी
पंखाने उचलून घ्यावी?
नजर कुणाची ओली
ओठांनी मुक प्यावी

झेप संपल्यापरी
पंखाचे कसले ठसे?
ढगाच्या काळजावरला
व्रण ओला का दिसे?

ढग,पंख,पक्षी...
किती मनाची झेप
यशोधरेच्या जखमेला
सिद्धार्थाचा लेप

मनाच्या दगडातुन
निपज एक लेणी
चुकवून दे अलवार
शतजन्माची देणी

असेच काहीबाही
शब्दाआडुन मांडावे
दुर शिखरावर जणू
ढग मुक्याने सांडावे 

हे शिखर,हे ढग
हे कसले अनामीक कोडे?
सांडत्या शब्दांचे अंतःकरण
अनूभवून घे थोडे

बही-या मनाला उगाच
द्यावी कसली हाक?
उचलून घ्यावा अलगद
दौतीत बुडाला टाक...
(•प्रताप•)
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com 
15/1/2021

Wednesday, January 13, 2021

तेवढीच एक आशा...

परक्या झाडाची
फुलावर वसते माया
बहरुन येण्या धरते
उन्हात आपली काया

बहर येता फुलणे
शिशिर येता ओके
मुक पाहती फांद्या
गर्द हिरवळीचे धोके

हर हंगामी आल्या
पाखरांचे झडती पंख
बुंध्यास कधी डाचे
वारूळाचा तीक्ष्ण डंख

मी ही झाडच!!
स्थिर,स्तब्ध उभे
झेलत तुझ्या वादळाचे
फुलखुडी मनसुबे

तु जाता, वसंत
तु शिशिर लांबलेला
पानगळीचा दिर्घॠतु
जणू फांदिवर थांबलेला

येईल एखादी धुन
ऋतु सजून जाईल
थकला पक्षी फांदिवर
विश्वासाने निजुन जाईल

तुझे हंगाम कधी फुलतील
कधी जातील हळुवार
मुळा वाहत राहतील तरीही 
झाडाचा सारा भार

रान भरत राहील
कधी होवून जाईल रिते
झाड गात राहील नित्य
मिलनघडीचे गीते....

आठवणीचे थवे पाठव
सांजेस हिरवळ फुटेल
चुकला माकला पक्षी
साथीस आपल्या भेटेल

नसेल हिरवळ तरी
बोलतील फुलो-याची भाषा
पुढच्या हंगामासाठी झाडास
तेवढीच एक आशा...
(•प्रताप•)
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com 
13/1/2021

Monday, January 11, 2021

घडून यावे.....

रातीस पहाट सावरे
धुके अलगद सरे
मुक नदीच्या गर्भात
वाहती ओले झरे

त्वचेस लगडती फुले
स्पर्शाला ये सुवास
रोमांचाचा चाले मुक
हृदयतळी प्रवास 

अलगद तुझे वारे
झाडास माझ्या झोंबे
नजर तुझी चिंब
नजरेत माझ्या थांबे

मनास आलिंगन मनाचे
स्पर्शास असे चोरी
ओळख तुझी थांबे
अलगद पाठमोरी 

मी ठसा मनीचा माझ्या
तुझ्या काळजी गोंदी
वेलीने तुझ्या घ्याव्या
बहराच्या माझ्या नोंदी 

मनात उमटले गहिवर 
मोजून घ्यावे सगळे 
दुर पठारी उत्सुक 
झेपावण्या उंच बगळे 

वेलीच्या नाजुक कडेवर
फुल सावरे तोल
आठवणीस माझ्या असते
तुझ्या दुराव्याचे मोल

चांदण नसत्या राती
तुला द्यावी हाक
मिलनोत्सक पैंजणाला
यावी चांदण्याची झाक

माजघरातील दिव्याला 
फुटावी माझी भाषा
या तळहातास बिलगावी
तुझ्या हाताची रेषा

रातीस पडते स्वप्न 
तसे घडून यावे
दुराव्याचे उमलते फुल
अलगद झडून जावे....
(•प्रताप•)
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com 
11/1/2021

Wednesday, January 6, 2021

उडून गेले पारवे....

मनाच्या भाषेचे
धुक्यात दडले शब्द
वाहत्या वा-याची
झुळुक हो स्तब्ध

मोसमाच्या मनाला
बहराचा भास
आसमंती सांडे
आभासाची रास

त्या झाडाला ठावे
गुज गुपीत सारे
रातीच्या नि:श्वासांना
मोजत राहती तारे

आठवत असतो तुझ्या
अस्तित्वाचा स्पर्श
पानझडीच्या फांदिला
अंकुराचा हर्ष

दुर जिप्सी राहतो
रानात पसरे संगीत
रातीचा कोपरा हळवा
होवून जातो रंगीत

जाण्यास ना नाही
पण असे कसे जाणे?
साक्ष देत्या झाडाचे
ओरबडत पाने

हवा बोलत नाही
रात थांबत नाही
उधाणलेला प्रहरही
घटीकेशी झोंबत नाही

नित्य जंगलातुन
येई हाक ओली
मी शोधत राही मुुक
हाकेची गर्त खोली

अवचीत पाऊस कसला
थेंबाचे एकले झुरणे
झरत्या थेंबास झेलत
पंखानी आसमात फिरणे

हा पाउस,हे धुके
हे मनात जंगल हिरवे
मी मोजत असतो राती
उडून गेले पारवे.....
(प्रताप)
"रचनापर्व"
7/1/2021
prataprachana.blogspot.com













राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...