चंद्रझडीच्या राती
भिजे चांदणे ओले
मुक मनाशी माझ्या
मन तुझे का बोले?
साचल्या मनाचे
तुषार कसले येती?
मी उजवून घेतो नित्य
पावलात विखुरली माती
रात दाटल्यावेळी
हाक कशाला द्यावी?
ओठास फुटावी माझ्या
तुझ्या आठवणींची ओवी
बंद पापण्या आड
तु कसला रंग भरला?
खोल ढगाच्या काळजात
अलगद वारा शिरला
जाग्या तुझ्या पापण्या
अंधाराची ओली हाक ?
थरथरत्या बोटांना ये
माझ्या स्पर्शाची सूक्ष्म झाक
तळव्यास चांदवा भेटे
सोनेरी तुझा चेहरा
मी सावडून घेतो सा-या
आभासाच्या मोहरा
तुझे हाकारे घेवून
पारवा राती फिरतो
जिव कुणाचा राती
अलगद मुक झुरतो
हळुवार उघड खिडकी
येईल कळ्यांना जाग
वारा शोधत येईल
तुझ्या तनूगंधाचा माग
चंद्र कुशीला असता
आभाळ कशास रूसते?
कोणाच्या हृदयात खोलवर
कोणाचे मन वसते?
या ओल्या रातसमयी
आसमंत भिजलेला
मी चंद्र तुझा पाहीला
माझ्या मनात निजलेला...
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
28/1/2021
No comments:
Post a Comment