अवकाशाच्या कुशीतुन
चंद्रकोर डोकावे
चकाकत्या आठवणींना
मग कोण कसे रोखावे?
रातीची रानसावली
झाकत जाते काया
सजत्या चांदणदिव्याचे
शृंगार जाती वाया
नेमाने रोज मी पाही
उगवतीची तारका
चंद्र माझा नजरेपरी
हो अंधार बिचारा पोरका
सय कसली दाटे हृदयी
कोण वेलीखाली उभे?
नुसता आभास फुलांना
फुलण्याचे मनसुबे
सजणाची ओढ जिवा
खिडकी ठार खुली
रात देई चकवा
चांदण्याच्या सांजभुली
घटीका तिळ तिळ तुटे
बोटांची गुंफण होई
श्वासाची चाले लय
नि:श्वासाची गुंफण घाई
रात सरता सरत नाही
पहाट वेशीत रूसुन बसते
खिडकीच्या बिजागरीला
झुळुकीची साथ असते
स्वप्नाचे लामणदिवे
अलवार होती मंद
हवेस कसला येतो
वस्त्राचा धुंद सुगंध
नयनांना चकवा होई
स्वप्न पापण्यास बिलगे
पहाटेच्या काकड आरती
नंदादिप तो शिलगे
दुव्यांना सुटते एक
व्याकुळ ओली भाषा
खिडकीच्या तावदानावर
दिसे पुसट एक रेषा.....
(•प्रताप•)
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com
17/1/2021
No comments:
Post a Comment