Monday, January 11, 2021

घडून यावे.....

रातीस पहाट सावरे
धुके अलगद सरे
मुक नदीच्या गर्भात
वाहती ओले झरे

त्वचेस लगडती फुले
स्पर्शाला ये सुवास
रोमांचाचा चाले मुक
हृदयतळी प्रवास 

अलगद तुझे वारे
झाडास माझ्या झोंबे
नजर तुझी चिंब
नजरेत माझ्या थांबे

मनास आलिंगन मनाचे
स्पर्शास असे चोरी
ओळख तुझी थांबे
अलगद पाठमोरी 

मी ठसा मनीचा माझ्या
तुझ्या काळजी गोंदी
वेलीने तुझ्या घ्याव्या
बहराच्या माझ्या नोंदी 

मनात उमटले गहिवर 
मोजून घ्यावे सगळे 
दुर पठारी उत्सुक 
झेपावण्या उंच बगळे 

वेलीच्या नाजुक कडेवर
फुल सावरे तोल
आठवणीस माझ्या असते
तुझ्या दुराव्याचे मोल

चांदण नसत्या राती
तुला द्यावी हाक
मिलनोत्सक पैंजणाला
यावी चांदण्याची झाक

माजघरातील दिव्याला 
फुटावी माझी भाषा
या तळहातास बिलगावी
तुझ्या हाताची रेषा

रातीस पडते स्वप्न 
तसे घडून यावे
दुराव्याचे उमलते फुल
अलगद झडून जावे....
(•प्रताप•)
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com 
11/1/2021

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...