Saturday, January 30, 2021

रेशीम खुणा.....

ते एकांतीतील दुवे
मनात खोल दाटले
पुन्हा हो तुझा आभास
क्षणास या वाटले...

देठ कसले फुल जपते
कशास बहराचे दान
मी उचलून घेतो अलगद
तुझ्या नजरेची आण

चंद्र तळात बुडला
लाटा थडीस भिडती
चकोराच्या काळजाला 
आठवणीची झडती

तुझ्या आत्म्याची विराणी
आभास तुझा बाधतो
आठवणीचा काळीजक्षण
मुहुर्त रातीचा साधतो

मुक खोडल्या शब्दांची
कविता गेली सांडून
मी खोल मनाचा चांद
दिला भाळी तुझ्या मांडून

लहरीवर स्वार पक्षी 
थवे निघाले दुर
रातीत कोण आळवे
मुरलीचे ओले सुर?

रातराणीच्या तनाला
तुझ्या श्वासांचा सुवास 
मनाच्या पाखराचा मग
तुझ्या दिशेला प्रवास 

कसली चाहूल लागे
तुला झोपल्या राती?
मिटल्या तुझ्या डोळ्यात 
उजळून येती वाती

कुस अलगद बदल
चंद्र होईल चांदणे
खिडकीस लगडून जाईल
स्पर्शिण्या तुझे गोंदणे 

अलगद मिठीत सावर
माझ्या मनाची पहाट
रेशीम खुणा उमटल्या
पाहून घे ललाट.....!
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
30/1/2021

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...