एकट माळरानावर
अभंग एकला पडला
जिव जणू की त्याचा
त्या रस्त्यावर जडला
शब्द जणू भंडारा
हवेस पिवळी कांती
तुझ्या श्वासाच्या गंधात
मी ढवळून घेई शांती
हा उरूस कसला चाले
हे कसले संदल जळते?
चाहूल तुझी अनवाणी
अलगद मनास मिळते
दुर एकली सांज
तळव्यात चांद उगवे
सांजस्पर्शी सुर्यास्त
दुःख दाटते भगवे
हा तमफुलता बहर
नजर तुला मी केला
राधेच्या अंगाखांद्यावर
कोणाचा सजतो शेला?
नजर अशी अंधारात
आभास तूझे चिणते
रात एकट भारी
आठवणही शिणते
दुर पेटता दिवा
वारा तिकडे वाहतो
उडता चकोर व्याकुळ
खिडकीस तुझ्या पाहतो
श्वासांचे तळ गाठत मी
तुझा माग घ्यावा
असे रुजावे अंतरी
जणू तुझा भाग व्हावा
दगडाला फुल यावे
मातीस ओल सुटावी
हृदयाची हाक ओली
ओठास तुझ्या फुटावी
रात अंधारास भेटावी
दिवे व्हावेत मंद
श्वासास बिलगुन यावा
तुझा आभासी गंध......
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
1/2/2021
No comments:
Post a Comment