Wednesday, February 24, 2021

नजरभुल....


होते कधी नजरभुल
दृष्टीला पडतो फेरा
झुळुकीच्या आतखोलवर
दडला असतो वारा

द्यावेत शिंपले सारे
ओतुन नदीच्या काठी
एकांताच्या सांजवेळी 
द्याव्यात मनाला भेटी

उगा कशाला स्वतःला
सावलीने बावरून घ्यावे?
सैलावल्या पिंपळाच्या 
पानांना आवरून घ्यावे

बहरांना मुक्त करून
पानगळीचे ॠतु पहावे
दुःख बनून नदीचे
सागरतळी वहावे

पसरल्या पदरांना
चांदण्याचे दान द्यावे
चंद्राला नकळत नभी
अवसेचे भान द्यावे

स्वतःच्या चांगुलपणाची
उतरून दृष्ट घ्यावी
मागत्या नजरांना
तिट ही उधार द्यावी

मनात उजळून घ्यावेत
मग अंतरीचे दिवे
जुन्याच त्या आभासांना
भासून जावे नवे

अलवार परतून यावे
दुर देश सोडून
तुटल्या फुलांना द्यावे
निर्माल्याशी जोडून 

आकांताचा अर्थ मग
द्यावा हवेत पसरून
हाकेच्या पुका-यांना
जावे सरळ विसरून

मनाच्या कवाडावरली
खोडून द्यावी नक्षी
मुक्त करावा कसोशीने 
मनात जपला पक्षी....
(pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
24/2/2021

 

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...