माझे शब्दांचे सुर
मनात दाटे बासरी
रविकिरण उगवतीचे
रेंगाळती तुझ्या ओसरी
या फुलांचे गंध
तिकडे तुझ्या दुरदेशी
तुझ्या काफिल्यांच्या
प्रतिक्षेत उभ्या गाववेशी
भिंतीना सुचून जाते
तुझ्या आठवांचे शिल्प
शब्दांचे प्रहर येती
अवतरण्या काव्यकल्प
खिडकीला फुटते नजर
दुरदेशी ती भिरभिरे
नदीस उजवून देती
गर्भपाताळी झरे
हीच नदी तिकडे
सांगावा घेवून येते
दुःख कुणाचे ओले
सागर दिशेस जाते?
फुलल्या बागांचे उसासे
नदीस देती हाका
प्रवास सागरकुशीचा
चाले नदीचा मुका
चांद उगवे राती
अवकाशी रात जळते
दुःख केवड्याचे
बागेस खरेच कळते?
चांदणनक्षिचे पाणी
गवतावर अलगद सांडे
दवबिंदूच्या हृदयातून मी
मन कुणाचे मांडे?
अलवार मंद होती
नयनांच्या जळत्या मशाली
सकाळच्या प्रहरी थव्याने
आणावी तुझी खुशाली....
(pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
28/2/2021

No comments:
Post a Comment