डोळ्यात दाटती डोळे
कसले हे मधूर सुर?
वाळवंटाच्या अंतःकरणाला
ये मधुमालती पुर
चंद्रबुडीच्या वेळा
पहावा तुटता तारा
तनूगंधाने भारलेला
स्पर्शुन घ्यावा वारा
ओल दाटले दवबिंदू
गवताला बिलगुन जाती
पहाट रिती होताना
मंद जाहल्या वाती
चंद्र कुशीला असता
आभाळ का पेटते?
का रातीचे काजळक्षण
रेखावे नयनी वाटते?
डोळ्यास बिलगून पापणी
वाट कुणाची पाही
आर्त भूपाळीच्या शब्दातुन
कोणाचे दुःख वाही?
मंद जाहले चांदणे
दुर तळ्यात बुडते
पहाटेच्या ओल प्रहरी
मन दवबिंदूवर जडते
ओस दाटल्या ओठांनी
अजान आर्त द्यावी
मी टिपून घ्यावी अलगद
चिंब जाहली ओवी
गोंदणफुलाच्या ताटव्यात
हे कसले फुलती बहर
घट्ट धरून ठेवावेत
हे चंद्रबुडीचे प्रहर
भुईला नभाने
सकाळ प्रहरी पहावे
दुःख चकोराचे नदीवर
अलगद मंद वाहावे
शब्दांना सुचावी माझ्या
नभाची किरणमाया
मी ओढून घ्यावी आत्म्यावर
तुझी चांदण काया....
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com

No comments:
Post a Comment