हे रानफुलांचे गंध
अस्तित्व तुझे ओझर
ओंजळीत या साचती
मृगजळांचे पाझर
जाणा-या झुळकीने
आत खोल काय पेरले?
बंद जाहल्या पापण्यांनी
आभास कुणाचे हेरले?
प्रतिमेस कसली घाई
कोणाचे रूप ठसले?
शहारणा-या आरशाचे
काळीज कोण पुसले?
पडवीत चंद्र सांडला
भुई चांदणे झाली
आभाळात मग कसली
बहर पेरणी झाली?
हृदयास माझ्या लगडती
आसुस हाकेची फुले
तेच ताटवे शोधी
जे नजर तुला मी केले
आठवणींच्या भिंतीवर
मी रेखाटे आसुस नक्षी
सुस्का-याच्या बनात विहरती
आस दाटले पक्षी
मृगजळी मुहुर्तावर
काफीले चालत येती
मी चंद्र पाहतो उत्सुक
उन्नत झाल्या माथी
ती पडशाळा नोंदवून घेते
पारव्याची नि:शब्दी झेप
परतवून लावताना तुझ्या
आठवणींची हर खेप
मुक आभाळाखाली
होई पायवाटही धुसर
त्या झाडालाही पडला
तुझ्या पायरवाचा विसर...
वाट, झाड,चांदणे
सा-यांना तुझी आस
नसेल येणे शक्य
पाठव किमान भास..
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
15/2/2021

No comments:
Post a Comment