Saturday, February 6, 2021

मनाची मुकभाषा....

ही बेकफन पाने
हा बेदर्दी शिशिर
यावेस तु या क्षणी
कशास हा उशीर?

दुरदेशी चांद उगवे
बेनकाब होती तारका
स्वप्नास आभास होई
निव्वळ तुज सारखा

वा-याने झाड हाले
पानांना होई शिक्षा
ओंजळीत माझ्या पडे
शुष्क पर्णाची भिक्षा

सिध्दार्थ निघे अनवाणी
पिंपळ पान पसरे
मुद्रेत त्याच्या लोपे
दुःख मनाचे हसरे

शोधता आत्म्याचे कोने
त्यास दुराव्याचे सुतक
मनास बिलगे माझ्या तुझे...
असण्याचे घोर मिथक

मनाच्या हाकांचे प्रदिर्घ
सुर उमटती गहीरे
मन नसावे कोणाचे
असे ठार बहिरे!

ही हवा कुणाचा निरोप
अलवार होवून आली?
चंद्र भासतो रेशीम
झाले चांदणेही मखमली!

ॠतु अनामिक फुलतो
शिशिरासही ये बहर
गळल्या पानावर विसावे
मिलनघडीचा प्रहर

दुर दिव्याची माळ
चमकुन होते मंद
गळल्या पानासही येई
बहराचा नवसुगंध

आभास इतका सुंदर!
हो वास्तवाची अभिलाषा
तुझ्या मनात रूजावी
माझ्या मनाची मुकभाषा
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
6/2/2021

















No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...