खुलते चंद्रसखे तुझ्या
स्पर्शाचे चांदणे मखमलीचंद्रास जाहला मोह
तो झरतो सांजभुली
दाटल्या अंधारास बिलगे
का काहूरी पणती?
आतुर माथा विसरे
श्वासांची आर्त गिणती
विरघळून होते लुप्त
जाणिवेची सावली
ओढ तुझ्या मनाची
मनात माझ्या धावली
तरंग उमटून संध्या
अशी व्याकुळ-व्याकुळ
फांदीवर उमलून येई
सांजबावरा बकुळ
तुझ्यात जिव शोधी
माझ्या मनाची खुण
अंतरंगात उमडून येते
वेणूची गोकुळी धुन
निघून गेल्या पावलांचे
हे धुसर होते ठसे
दंग जाहल्या दिशांचे
परतवावे पुकारे कसे?
अधांतरी हवेत फिरते
मिलनाची दंतकथा
चंद्र नित्य नोंदवी
चांदण्याची विरहव्यथा
कवडशातुन स्पर्शे चंद्र
खिडकीचे तावदान
ओंजळीत तुझ्या ओसंडे
स्वप्नांचे मखमली दान
शिखरमाथ्यावरून घुमतो
पुका-याचा हळवा मंद्र
तुझ्या आभासी प्रकाशात
व्याकुळ होतो चंद्र
शब्दांची पुनव होते
अवकाशी रात जळते
निजल्या चंद्रास स्वप्नात
चकोराची प्रित कळते..
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
8/2/2021
No comments:
Post a Comment