Saturday, February 13, 2021

आभासाची पाने....



दुःखाहून उत्कट
असे काही असते
झोंबत्या शिशीराला
पान गळत हसते

तुटव्याचा भावबंध
फांद्यात वारा हरवे
गळल्या पानांचे
मन हळवे बरवे

मुठीतच राहे
पाखरांचा चारा
झेपावले पंख
खुणावतो वारा

ओक्याबोक्या फांद्या
झाड एकाकी एकले
पदरात घेई बहराचे
चुकले माकले

शिखराच्या अंतरंगी
पायव्याची आस
शिरावळाच्या मनाला
थंडाव्याचा भास

सारे काही मुक
मनी कोण बोले?
एकाकी अश्रुंना
प्रतिक्षेची फुले

रान सारे सुने
बहराचे वाण
मी वाहतो ओंजळी
तु वाहिलेली आण

नजरेला राही
तुझ्या दिसण्याची आस
मिटल्या पापण्यांना चुंबे
तुझा ओला भास

शब्दांच्या पल्याड 
माझ्या संकेताची भाषा
कविता शोधे तुला 
जाती वाटा दुरदेशा

हलकेच गाते रान
बहराचे गाणे
शिशिराच्या फांदिला
आभासाची पाने....
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
13/2/2021
 


No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...