ही हवेची सलगी
हा स्पर्श वा-याचा
मी घेई माग तुझ्या
अवकाशी ता-याचा
दुर रेतीबनात काफिले
दिशा ध्रुवतारी
अनंत कंपने मनात
छेडते एकतारी..
रेतीला फुटते कहाणी
वाळवंट होते जागी
खुरटे झुडप बेफुली
गंध हवेला मागी
आकाशगंगेचा विस्तार
जोवर नजर जाई
संथ जाहल्या काफिल्याला
मरूद्यानाची रेतघाई
एक मुसाफिर गातो
आर्जवी धुनीचे सुक्त
रेतीचा आत्मा होई
मृगजळातुन मुक्त
थकल्या अवलियांच्या
मझारीचे सपाट रस्ते
संदलाची धुप सुगंधी
काफिल्यावर हसते
मुसाफिर शोधत फिरतो
युगाच्या पाऊल खुणा
रेतीस संदर्भ लागे
तुझ्या पावलांचा प्राचिन जुना
वाळवंट अबोल होते
हर काफिल्याचे जाणे
कोण आळवत असते
हर फेरीत ते मिलनगाणे?
रेती भुरभुर उडते
हवा दुरून येते
ओंजळ कुणाची वाळवंट
अलगद भरून येते
मी मुसाफिराचे शब्द
कवितेत माझ्या घेतो
मग बेफुली त्या झुडपाला
तुझा तनूगंध येतो.....
(pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
25/2/2021
No comments:
Post a Comment