सौदे किती करावे
आठवणीच्या सवे?
झाड मुक स्विकारे
हुरहुरीचे थवे
किती सहज ही हवा
आल्या पावली निघते
रोज उगवत्या चंद्राला
कोण उसासून बघते?
दिवेलागणी वेळी
ही कसली रातलागणी?
खिडकीस कशास करावी
चंद्रोदयाची मागणी?
परक्या आभाळाला
देवून आपला अवकाश
झिरपत्या चांदण्याला
उचलून घ्यावे सावकाश
ती हसती जादू सांडे
वेल फुलांनी भरते
एकट माळरानावर
मन कुणाचे फिरते?
नाजुकशा हालचालीचा
दिवा ओसरी पेटे
वातीचा आत्मा जळता
प्रकाश साजरा थाटे
भरून गेली सांज
रित्या रातीत सरते
चंद्राच्या थेट मागे
रातीचे काळीज झरते
दाराच्या कवाडांना
उंबरठ्याची बाधा
माळरानाच्या बासरीत
विहरते माजघरातील राधा
मनाचा मनाशी
संवाद अबोली चाले
एकट संध्यासमयी
दुःख बोलके झाले
रोज सांज येते
जाते रात थकून
दारी साळुंक्याचा थवा
हो मिलनघडीचा शकुन...
(pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
23/2/2021
No comments:
Post a Comment