Saturday, February 27, 2021

भाषाअंती समाजाच्या मरणकळा...

भाषाअंती समाजाच्या मरणकळा.....

आद्यकवी मुकुंदराज यांच्या 'विवेकसिंधू' याला मराठी भाषेतील पहीला ग्रंथ म्हटले जाते. लिखीत स्वरूपात उपलब्ध मराठी भाषेचा हा जरी पुरावा असला तरी बोली स्वरूपात मराठीचे अस्तित्व यापेक्षाही पुरातन...!! प्राकृत या स्वरूपातून अलीकडील इंग्राजळलेल्या अवस्थे पर्यंत आपल्या मराठीचा प्रवास! कोणती भाषा बोलावी?कोणत्या भाषेला प्राधान्य असावे हा वादाचा विषय आहे. पण एकाच वाक्यात सांगायचे तर " भाषा आई असते". नवजात अर्भकाला आई गर्भातुन बाहेर आल्यास जसे जगवते,तगवते तशीच भाषा आपल्याला या जगाशी जोडत असते व त्या जगात टिकवत असते. भारत हा एक भाषासमृध्द देश आहे. अनंत भाषा असणारा हा देश प्रत्येक भाषेचा तेवढाच गोडवा,तेवढेच माधुर्य!! जवळपास तिन दशकाचा अभ्यास करून भारतात पहिल्यांदा सुव्यवस्थित भाषिक सर्व्हे करून जाॅर्ज ग्रेअर्सन या व्यक्तीने 1928 मधे भारतीय भाषेची वैविध्यता निदर्शनास आणून दिली.तद्नंतर अलिकडेच हा प्रयत्न होवून भाषावीद् गणेश देवी यांनी तब्बल शतकानंतर 2010 मधे हा प्रयत्न केला... तब्बल 10 वर्ष भाषेसाठी स्थानीक सर्वेक्षण करून त्यांनी भारतात सध्या एकुण 780 भाषा असल्याचे नमूद करून, अभ्यासाअंती त्यांनी दिलेले भारतातील प्रादेशीक,बोली व मातृभाषेबाबत त्यांचे निष्कर्ष वेदनादायी आहेत...इथे दररोज एक बोलीभाषा नष्ट होते आहे अशी अवस्था आली आहे."एक बोली मरणे म्हणजे एक संस्कृती मरणे होय, एक भाषा मरणे म्हणजे हज्जारो वर्षाचा मृत्यू होणे होय" असे नमूद करून येत्या 50 वर्षात भारतातील साधारणतः 40 भाषा नष्ट होतील असा शास्त्रीय निष्कर्ष काढला आहे. त्यांनी विविध प्रकारचे 90 खंड प्रकाशित केले आहेत.
विविध भाषा या कुठल्या एका विशिष्ट भाषेतुन उगम पावल्या आहेत हा जरी प्रचलित सिध्दांत असला तरी भाषा ही जनमानसातुन, जमिनीतुन समाजात येते, ती समाजात स्थिरावते, निघालेल्या काफिल्या सोबत ती कधी लोककथा,कधी लोकगीत, कधी म्हणी, कधी वाक्प्रचार, कधी व्यवहार भाषा, कधी झानभाषा तर कधी इतर काही रूपात समाजात प्रवाही होते, स्थिरावते, विकासाला भिडते..आणी मग कालांतराने जगरहाटीच्या व्यवहारासाठी, अंधानुकरणातुन,स्वभाषा ही निम्नदर्जाची आहे या न्युनगंडातुन तर कुठली तरी एक विशिष्ट भाषा श्रेष्ठ आहे या गैरधारणेतुन किंवा राजाश्रय न मिळाल्याने आपली भाषा( जी आपल्या आई नंतर आपल्याला जगात तगवते) तीचा आपण अनादर करतो,आपली बोलीभाषा बोलल्याने आपली पार्श्वभुमी लोकात उघडी पडेल या न्युनगंडातुन आपण आपल्या भाषेला अलगद नष्ट होण्यासाठी सोडून देतो...आणी मग अगोदर लिपी नसणा-या पण प्रचंड समृद्ध असणा-या बोली लुप्त होतात आणी मग लिपी असणा-या भाषा हळुहळु क्षिण होत नष्ट होतात...
मुळात हा गैरसमज नष्ट होणे गरजेचे आहे की, अमुकतमुकच भाषा श्रेष्ठ आहे. कारण या धारणेतुनच मग स्वभाषांचे दमन होते.कुठलीच भाषा अशुध्द,कमी दर्जाची नसते, सर्व भाषा या हज्जारो वर्षाच्या जिवनाचे संचित असतात. त्या नष्ट होणे म्हणजे त्या-त्या समुदायाच्या हज्जारो वर्षाच्या जगण्यातुन त्यांना मिळालेले सुज्ञपण,ज्ञान,शहाणपण, नितीतत्वे जे ते सहज आपणास त्या-त्या बोलीभाषेतून,मातृभाषेतून मिळू शकतात तीच कडी आपण सोडून देण्याचे पातक करतो,
आणी आपल्या पुर्वजांशी कृतघ्नता दर्शवतो...
राहता राहीला मराठी भाषेचा प्रश्न...ही एक अत्यंत संपन्न,गोडवादायी,ज्ञानवादी,व्यवहारवादी, समाजमन घडवणारी, नितीतत्व देणारी, भक्तीभावाची व अनेक शतकाचा संपन्न प्रवाह असणारी अक्षर व अमिट भाषा आहे. थोर संतविभुती पासून आज लिहण्याचा अल्पसा प्रयत्न करणा-या माझ्यासारख्या अनंताना प्रभावित व मंत्रमुग्ध करणारी ही भाषा आहे. मात्र निव्वळ सातत्याने भावनीक बोलून, इंग्रजीला शिव्याशाप देवून, राजकीय अस्मितेचा बिंदू बनवून,शासन राजाश्रय देत नाही वगैरे आगपाखड करून ही भाषा टिकणार नाही तर तीच्या अंगभुत जाज्वल्याने ती आमच्या मनामनात प्रवाही होणे गरजेचे आहे, तीचा आदर करत ती नित्यव्यवहारात, शिक्षणात, समाजमाध्यमात व साहित्यात ती प्रभावीपणे वापरणे गरजेचे आहे...अन्यथा अभिजात असणा-या या माऊलीचा आम्ही क्षय केल्याशिवाय राहणार नाही...इंग्रजी भाषेचा पुरस्कार करणा-या आम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की," स्वातंत्र्यपुर्व कालखंडात भारतीय प्रांतात पंडीत जेंव्हा इंग्रजी भाषेचा आग्रह धरत होते तेंव्हा थाॅमस मनरो व एल्फिस्टन सारखे इंग्रज मातृभाषेतुन ज्ञान याचा आग्रह धरत होते.." आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने समाजमाध्यमावर मराठी पोस्ट करून आपली जबाबदारी न संपवता आपल्या सर्व पुर्वजांच्या मुखवाणीतुन झिरपलेला हा अमृतधारेचा झरा आपल्यामुळे आटणार नाही याची प्रतिज्ञा व अंमल आपण करू, विविध ज्ञान घेवून आपल्या दाराखिडक्यात येवून उभ्या इतरही भाषा या सर्वांचा आदर करणे हे आपले पिढिजात संस्कारच दाखवेल...! न लाजता आपल्या बोली व प्रमाण भाषेचा आणी विश्वसंपर्काच्या भाषांचा आदर करा! वापर करा!! हे पिढीजात शहाणपणाचे प्रवाह जिवंत ठेवा!!! "मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.."
प्रताप वाघमारे,
तहसीलदार (महसूल)
विभागीय आयुक्त कार्यालय,
नागपूर

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...