दिप पेटले असता
हा अंधार कसला साचे?
मनात उमटल्या गझला
कोण मुक्याने वाचे?
सखे! हे शब्दांचे नक्षत्र
तुझा अर्थ लागे
निज दाटल्या राती
नयन तुझे का जागे?
अजूनही रेंगाळती
तुझे स्पर्श धुसर
मोरपिसी रातीत हो
तुझा मखमली असर
नयन निःशब्द होवून
काव्य कसले अवतरे
ओथंबलेल्या ओठांना
समर्पणाचे मग झरे
तळव्यावर साचे अलगद
हुरहुरणारे तळे
दुर उगवला चांदवा
रातीत मंद जळे
निद्रिस्त मनाला माझ्या
स्वप्नांचे गारूड भारे
मी अलगद उचलून घेई
तुला स्पर्शिले वारे
तु असता चांद फुलतो
नसता चांदणे रूसते
निद्रेच्या आर्त कुशीतुन
तु अवकाशी हसते
बहर फुलांचे घेवून
गंधित झाड होते
सडे प्राजक्ताचे चुंबती
तुझ्या घराचे जोते
निद्रेच्या खोल तळातुन
कोणाचे पैंजण वाजे?
तुझा आभास पेरे
गंध फुलांचे ताजे
असता सरत नाही
तुझी मखमली आस
नसता दाटून असतो
तु असल्याचा भास....
(pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
3/3/2021

No comments:
Post a Comment