अमिट खुणा सोडत
सावल्या पुढे निघती
चाफ्याचे फुल अवकाशी
कळ्या ढगास बघती
सखे! येता पाखरे परतून
निर्मितीमग्न होई जंगल
सांजबाव-या धुनीत
सुर दाटती मंगल
ही तिरप्या उनाची भिंत
सांज त्यात मिसळे
झुळुकीच्या मुक निनादी
फांदी अलगद उसळे
प्रतिक्षारत बुरूजावर
अज्ञात हाताचे पाणी
चोचीने उचलून घेती
तृष्णाकींत व्याकुळ गाणी
बुबळाच्या खोल आतुन
चाहुलीचा अदमास
साचल्या हुंदक्याला हो
कडे कोसळल्याचा भास
पापणीत अडकला पक्षी
अवकाशास देई हाका
पोर्णीमेच्या उजेडात
चांदण्याच्या साऊलचुका
शरिराच्या थरथरीवर
गोंदण भरतीच्या लाटा
ओठांना बिलगून येती
कवितेच्या अनवट वाटा
सांज बोलते प्राचिन
मिलनाची संकेतबोली
एक शहारा उमटे
चंद्राच्या त्वचेखाली
तु उगवून ये अवकाशी
सांजेचे आमंत्रण खुले
मी सजवून रानी देतो
फुलपाखरी स्पर्शफुले
पाखरांनी पुनव उचलावी
फैलावून आपले पंख
मी सजवून घ्यावेत ओंजळी
तुझ्या गोंदणाचे नाजुक डंख!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
29/3/2021
रचनापर्व
No comments:
Post a Comment