ती फडताळातील वही
तो गुलाब सुकलेला
जणू घाव कुणाचा वर्मी
हृदयी बसलेला
पानात सुगंधी झरे
फुल जरी सुकलेले
सारेच बहर भेटती
वसंतास मुकलेले
फुल वहीत बंदिस्त
काटे कोण नेले?
ताटवे बहरलेले
उदास व्याकुळ झाले
फुल बोलते भाषा
मुके गुज दाटलेले
गझलांना सावरती माझ्या
ही पाने फाटलेले
सुकल्या पाकळ्यांनी
शब्दांना द्यावा रंग
तुझ्या पाउलदिशेला
माझ्या कवितेचे तरंग
फुल शिल्लक ठेवून
बहर निघून गेला
सुकल्या गुलाबाचा मग
जिव पाचोळा झाला
कवितेला घडण देण्या
हे फुल देई आत्मा
जणू प्रकटून येई
निर्माल्यातुन परमात्मा
फुलत असतील ताटवे
तुझ्या बागेच्या पोटी
या शब्दांनीच तर भरल्या
त्या कळयांच्या फुलओटी
गंध कशाला नेऊ
बहर तुला जर दिले?
वहीत माझ्या असता
शब्दांची ब्रम्हफुले!
शब्द माझे अमृत!
वहीत गुलाब फुलतो
तुझा भरला वसंतही
या बहरांना भुलतो!
Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
22/3/2021
No comments:
Post a Comment