Sunday, March 21, 2021

भास दाटले अर्पण....

जातकुळी तुकयाची 
शब्दाला माझ्या लगडे
दगडाच्या मुर्तीचे 
दुःख अनामिक उघडे

राऊळी अबोल फुलांचे
निर्माल्य जाते वाया
भगवंत तरसतो धाराया
ओवीत दाटली माया

कवितेचे आकांत मुके
कोणाचे मन रडते?
गोसाव्याच्या झोळीला
शब्दांचे पातक घडते

अशी उदासवाणी 
ही कसली चाले भक्ती?
शब्दांच्या अवडंबरातुन
कवितेस मिळावी मुक्ती

मी चांदफुलीच्या नक्षी
नक्षत्रावर अलगद पेरे
चांद घालतो अवनीचे
अगणीत नित्य फेरे

फेरीत दाटे भाव
शब्दांचे चांदण ओले
तुझ्या प्रतिकांशी अगणित 
शब्दांचे सौदे झाले

दाटून येता तु
मनात होते गर्दी
लिहीता लिहता होती
शब्द तुझेच दर्दी!

हा कवितेचा पसारा
मी तुझ्यावर असा पसरे
मग वेचून घेई शब्दातुन
भाव अलगद हसरे

ती सुचते, ती रूजते
कधी होई ती पर्ण सडा
बिलोरी काचावरला ती
कधी भासे ओरखडा!

हे शब्दांचे लेणे
हे भावनांचे प्रतिक दर्पण
नसल्या राऊळी नित्य
हे भासदाटले अर्पण !
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
21/3/2021

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...