दवाच्या थेंबा! अरे
पहाटेतील पहिल्या
नको पडू आता
शिळेत निजली अहिल्या..
अंधाराची भिंत
काळी भिन्न उभी
ढगाला साधलेली
किरणांची खुबी
हळू पड रे दवा!
नको वाजवू पावले
पापणीचे दार तिने
आताशा लावले
थिजलेले आभाळ
तिने घेतला उशीला
निशीगंधी सुगंध
तिच्या मिटल्या कुशिला
जागत्या चकोरा
नको गाऊ गाणे
हलत्या पिंपळा नको
सळाळु तु पाने
निज मोडेल रे तीची
दुखावेल रातराणी
चांदण्याला फुटतील
का अंगाईची गाणी?
खिडकीला चुंबे
पहाटेची झाक
कळ्यांनो जरासा ठेवा
बहराचा धाक
झोपल्या चांदाला
पुनवेची आभा
कळीला स्पर्शिन्याची
सुगंधाला मुभा
युग साचलेले जणू
हा नितळ चेहरा!
मनाच्या कुपितली
जणू अत्तरी मोहरा!!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
30/3/2021
No comments:
Post a Comment