सखे! आज सांजवेळी
दिवे वात चुकले
ज्योतीचे मनही मग
प्रकाशाला मुकले
ते काहुरी रस्ते
आज मुक होते
त्यांना पुकारणेही
बहुधा चुक होते
हवेची झुळूकही
रित्या हाताने आली
जणू तुझ्या गंधाला
शिशिराची बाधा झाली
सावल्यांच्या झाडीत
अंधाराचे फुलले रस्ते
का कोण जाणे
ही रातही अबोल बसते
कसली फुटते ओवी
कसले हळवे सुर
माझ्या अवकाशाचा
चंद्र उगवतो दूर
ते नंदादिपही उजळ
फिक्या चांदणराती
कशास पातक घेते
अंधाराचे माथी?
तुझ्या व्याकुळ प्रहरी
हे कसले गीत नवे?
अशक्यतेच्या घटीकेतही
तुच तु संभवे
इथे अधून मधून पेरत रहा
तु असल्याचा भास
हे प्रतिक्षेचे पर्वही
मग बनून जाईल खास
पापण्यावर स्वप्न दाटता
डोळ्यांना येईल भरते
रातराणीची वेलही
जणू बहरासाठी झुरते
असू दे उशीला आभाळ !
झोप जर का लागेल
माझ्या बदली तुझ्या कुशीला
व्याकुळ चंद्र जागेल
(pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
5/3/2021
No comments:
Post a Comment