पक्षांचे हो देशांतर
दाटे निरोपाचे पर्व
पंख ठेवून मागे
कुठे निघाले सर्व?
तारकाचा तुकडा
नभातुन दिर्घ कोसळे
पंखझडत्या तिथीला
धुमकेतु भुगर्भी उसळे
ही रंगाची उधळण
कुठे पेटले अंबर?
चंद्रास नभी लटकते
आठवांचे निल झुंबर
त-हा फुलांची भोगे
तळव्याचे मेहंदी फुल
तुटत्या पिसात दाटे
शिशिर उसवती भुल
तुझ्या झाडाच्या फांदिला
पक्षांचा पडाव पडतो
झाडाखाली गोसावी
शोकगितातुन रडतो
पक्षांना सुटवत नाहीत
झाडात अडले सुर
झाडावर ओलाकंच
चांदण्याचा महापुर
झाडाला फुटते ओल
पक्षांना हिव बाधते
गोसाव्याच्या गिताला
पुनवेची रात साधते
पक्षांचा डेरा पडतो
झाडास फुलती फुले
पक्षी माझे बांधती
तुझ्या काळजाला झुले
तु वसंत त्याला म्हण
जरी रंग माझे असती
पानाच्या देठाखाली
शिशिराचे प्रहर हसती
जपून ठेव हा बहर
धारून घे हे रंग
कवितेला माझ्या फुटतो
मग हिरवा एक अभंग!!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
28/3/2021

No comments:
Post a Comment