Saturday, March 20, 2021

अंधार माझा सजतो

सांजेलाच का लागे
आठवांची झळ?
मी शोधत राही तुझ्या
अस्तित्वाचे तळ

झाडांच्या अबोल पानात
सळसळते शब्द पेरून
द्यावे झाड सारे तुझ्या 
आभासफुलांनी बहरून

कवितेचे अमरत्व मी
फांदिस बांधे झुला
फुलले बहर वाहतो
अनंत सारे तुला

दुर वारूळी मुंग्याचा
थवा करतो बांधणी
मी सजवून देतो अवकाशी 
एक स्फटिकी चांदणी

कबिर गातो दोहे
अनंताच्या पलीकडे 
कोणता देव तो
हुंदक्यातुन रडे?

सारेच बावर अवकाश
चंद्रास बाधते आभा
मी काळ्या ढगास देई
अंधार पेरती मुभा

दुर रानात पिक
प्रसवते अवघे मुके
कसले बहर रूजती
हे कसले आभासी धुके?

तुझ्या आठवणीचा प्रकोप
चांदण्याची धुळधाण
निपचीत निश्चल धुक्यात
बुडते तुझी आण

दुर रानात डोंगरकडी
झ-यांना देह फुटतो
भरल्या नक्षत्रात मग
एक तारा अलगद तुटतो

तो तुटता तारा घेवून
अंधार माझा सजतो
झाडांचा बहर मग
धरतीवर अलगद निजतो.
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
20/3/2021

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...