हवं तसं आभाळ
रेखणे जमत नाही
या बोटांच्या पेरांना
अवकाश गमत नाही
पिक कापणीच्या सुरात
रानाची वाट जळते
दुःखास लगडती जखमा
पक्षांची झुंबड छळते
शेकोटी भोवती चालती
लोकविलक्षण कथा
विस्तवात स्वाहा होती
प्राचिन मनाच्या व्यथा
वाटा निघुन जाती
दुःख पोहचे माहेरी
मायीचे हृदय जात्यात
दुःख दळे रामप्रहरी
हे वाट चुकले पाखरू
खिडीवर का बसले?
जड मनाच्या आत
दुःख दडवते कसले?
टाकून चारा पाणी
बोलेल का ते काही?
गावाच्या दुरवाटेला ते
असे उदास का पाही?
कोणाचा निरोप त्याच्या
चोचीआड अडला?
गोकुळाच्या माळावर
काल कृष्ण रडला!
गोठ्यात थबकती गायी
रान नकोसे वाटे
भर दुपारी वासरासाठी
कासेत पान्हा दाटे
गाव असा येई
जणू गायीचा हंबर
तेथल्या निपचीत वस्त्याना
जोडते विशाल अंबर
पेटल्या चुलीचे धुर
हवा इकडे आणते
पाराच्या चिंचेला प्रतिक्षेचे
घरटे कोण विणते??
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
12/3/2021
No comments:
Post a Comment