Saturday, March 13, 2021

चांदण्याची आण...


जळती रात हाती
चांद कुठे निघाला
चांदणीची आण मी 
दिली तुझ्या नभाला

वा-याच्या आत्म्यातुन
लहरीचा चाले दंगा
चकोर स्पर्शे चंद्र 
मनात तुझा पिंगा

मुक झुळुकी वाहती
कोणाचे नयन ओले?
हळदीच्या रंगाचे 
चंद्राचे हृदय झाले

मी दिल्या हाताचे आभास
हातात सजवून घेतो
तुझ्या हाताच्या रेषांना
तळव्यावर रूजवून घेतो

अनंताच्या वेदनेचे
मी चांदण झेलून घेई
मुक मनाच्या रातीशी
कितीदा बोलून होई 

यावी तुलाही आठवण
अशाच व्याकुळ वेळी 
निव्वळ दानाच्या आभासाने
भरून जाई झोळी

दुरून येतो इकडे 
आर्त हाकांचा ताफा
खुल्या चांदण्याखाली
झुरतो मुक चाफा

ओसरीत लावला दिवा
हलका, उदास, मंद
जळत्या वातीतुन प्रकटे
समर्पणाची धुंद

कसले असले रातीचे
उदास नदीचे पाणी 
सागराच्या दिशेचे
दुःख निघे अनवाणी 

मी त्यागुन देतो अलगद
स्वप्नांच्या मखमली राशी
खुण सोडतो माझी
ढगाआडच्या चंद्रा पाशी!
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
12/3/2021

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...