Friday, January 29, 2021

मनास तिकडे बिलगे......

आठवणीच्या तमात
शब्दांचे पेटती दिवे
आसूस हंबर माथ्यावर 
ओठांचे आभासी थवे

या तमबिजाच्या हृदयी
प्रकाश कसला फाटे?
इथे व्याकुळ भिजले मन
नयनी तुझ्या का दाटे?

अंधाराची सावली
दिव्यास हात धरावा
ओंजळीत शिरला वारा
वातीस स्पर्शत फिरावा

दुरदेशी चंद्र निजतो
आभाळ इथे सजते
स्वप्नझडीच्या सरीत
मन कुणाचे भिजते?

मन बहरते आभास
जणू उगळले चंदन
तुझ्या व्याकुळ हृदयाचे
इथे उमटती स्पंदन

या नयनांना स्वप्नांचे 
तुझ्या अलिंगन पडे
मी शिंपत जातो रातीवर
अत्तराचे सुगंधी सडे

कुस बदलता चांदवा
अंधार हळवा होई
श्वासांच्या खुलत्या कळ्यांना 
बहराची कसली घाई?

हातास शब्द सुचती
कवितेची होई लागण
बंद पापण्या खाली
बहरून येई साजण

चंद्रफुलांचे फुलवे
चेह-यास तुझ्या बहर
ओठांनी टिपून घ्यावेत
हे व्याकुळतेचे प्रहर

निजल्या रात घडीला
वणवा आठवणीचा शिलगे
मन माझे व्याकुळ ईकडे
तुझ्या मनास तिकडे बिलगे....
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
29/1/2021

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...