मावळतीचा रवी रेंगाळे
उडे गोखुरांची धुळ
मी शोधी सायंकाळी
चांदण्याचे चंद्रकुळ
सांजभारल्या तळ्यावर
मन भरते पाणी
माळ तुडवती पैंजण
होवून अनवाणी
पाण्याच्या अंतरंगी
कसले तरंग उठती
गोठ्याच्या आडोशाला
ओले पान्हे फुटती
काट्यांना दाटे सलगी
फुलात जिव दडलेला
दुर भरकटे पतंग
अवकाशी उडलेला
ती तुटली फांदी गाते
बहराच्या व्याकुळ ओव्या
धुसर सावल्या फितुर
रातीवर जडते माया
तळे वाहवत नाही पाणी
भरण्या येईल कोणी
त्या विसरल्या घड्याला
फुटेल आठवणींची वाणी
सांज दाटते रानी
झाडांना पडते भुल
फांदीवर मुक बसते
एक अबोल फुल
रस्ता हळुच निघतो
गावास नसते दिशा
तळ्यात विरघळून जाते
गर्द काजळी निशा
तळे हालत नाही
निघून गेले घडे
माळ शिकतो नित्य
प्रतिक्षेचे धडे
घड्यास कसला दोष?
कधी भरले, कधी रिते
तळ्यास सुचती नित्य
कंच ओली प्रेमगीते....
(•प्रताप•)
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com
18/1/2021
No comments:
Post a Comment