या हवेला आता
वाचा फुटत नाही
हवेच्या पदराचा तरी
गंध सुटत नाही
दुरवर अवकाशी
ढगांचे कळप गेले
इथे कुणाचे मन
ओथंबे...कंच ओले?
दुरदेशीची सारंगी
इकडे तरंग धाडी
अवकाशाला भिडे
पक्षाची विभक्त जोडी
हाक कुणाची कोणी
पंखाने उचलून घ्यावी?
नजर कुणाची ओली
ओठांनी मुक प्यावी
झेप संपल्यापरी
पंखाचे कसले ठसे?
ढगाच्या काळजावरला
व्रण ओला का दिसे?
ढग,पंख,पक्षी...
किती मनाची झेप
यशोधरेच्या जखमेला
सिद्धार्थाचा लेप
मनाच्या दगडातुन
निपज एक लेणी
चुकवून दे अलवार
शतजन्माची देणी
असेच काहीबाही
शब्दाआडुन मांडावे
दुर शिखरावर जणू
ढग मुक्याने सांडावे
हे शिखर,हे ढग
हे कसले अनामीक कोडे?
सांडत्या शब्दांचे अंतःकरण
अनूभवून घे थोडे
बही-या मनाला उगाच
द्यावी कसली हाक?
उचलून घ्यावा अलगद
दौतीत बुडाला टाक...
(•प्रताप•)
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com
15/1/2021
No comments:
Post a Comment