आठवणीचे चांदणे
व्यापला त्यांने माळ
चंद्रकलेसम वाढे तुझ्या
प्रतिक्षेचा काळ
अंधूक काळ्या राती
दाटे चाहूल भिती
मोडून पडल्या फांदीला
फुले लगडती किती!
नदी उतरते अलगद
वळणाचे चुकवत स्पर्श
शब्दाला माझ्या बिलगे
आठवणीचा हर्ष
दुर दिसे एक समई
वातीतुन जळताना
चंद्र उदास पाहे
ढग मुके पळताना
चंद्र उगवता नभी
ओंजळ तुझी भरते
दुःख चकोरी आर्त
कोणाच्या नयनी झरते?
तु चंद्रफुलीच्या वेळी
दिवे नको ना विझवू!!
ओथंबओल्या आर्जवाने
चांदणे नकोस भिजवू
दुर जात्या ढगांना
का लागे तुझा लळा?
व्याकुळ झाल्या हृदयाला
गाईच्या हंबर कळा
मालवलेल्या दिव्याला
चंद्राचा उजेड जाचे
टक्क जाग्या पापण्यांनी
अंधार कोण हा वाचे?
रातघडीचे रंग
दारात तुझ्या पडलेले
वेल जणू फुलांचे
काल ..मुक ...रडलेले...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(15 ऑगस्ट 2021)
No comments:
Post a Comment