Sunday, August 29, 2021

आठवणीचा शुक्रतारा....

हवेच्या अंतरातुन
गंधित झुळुक वाहे
बंद डोळ्यांनी तीस
व्याकुळ मन पाहे

हे सुरांचे चांदणक्षण
चांद असा का निजला?
दिप तेवता एकटा
रातीतुन मुक विझला

गवतास फुटता भाषा
निशीगंध ही बोले
स्तब्ध जाहल्या पावलाने
वाट कुणाची चाले?

हाक तुझी मुकी
चकोरा नभी वाहू दे
ढगाआडच्या चंद्राला
घन व्याकुळ होऊ दे

रात जळु दे अशी
जसे जळावे चंदन
सैल होऊ दे चांदणे
ओलांडून घनबंधन

दर्या ही गाई लाटांचे
आर्त गहिवर काव्य
तुझ्या स्पंदनाचे नाजूक
गीत जणू ओले-श्राव्य

आभाळात रेखू दे
तुझ्या कांतीचे चांदणे
दे उसणे भरण्या रंग
तुझे नक्षत्राचे गोंदणे

रातीस वाहू दे
तुझ्या बहराचे फुल
गहि-या नजरेची
गहिरी जादूई भुल

अखंड बुडू दे
या अंधाराच्या धारा
मी प्रकाशेन नभी तुझ्या
आठवणीचा शुक्रतारा.....
(Pr@t@p)
" रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
29/8/2021














No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...