दुर दिव्याचे जळणे
वारा वाहत नाही
धुक्याळला चंद्र ही
तारा पाहत नाही
गर्द धुक्याला फुटते
किरणांची मंद लकाकी
दुर डोंगरमाथी...
झाड उभे एकाकी
तु चंद्रनिजीच्या वेळी
विलगुन फुलांचे ताटे
ओंजळीत माझ्या
सुगंध अनामिक दाटे
पहाट ओले दव
रातराणी गंध ओला
मंद जाहल्या दिव्याला
झुळुकीने स्पर्श केला
रात झडीचे तारे
हळुच होती मंद
ता-यांना बिलगुन जाई
तुझा अबोली गंध
वारा शिलगून देतो
उगवतीचे कोने
तुझ्या सुगंधी ताटव्याचे
उजळून लख्ख होणे
दुर भूपाळी गुंजते
कुठला रावा गातो?
थवा एकला ओढीने
कुठल्या गावा जातो?
निरोप माझे पंख
हवेत घेती झेपा
किती जाहल्या अगणीत
तुझ्या दिशेस खेपा?
नित्य सकाळ करते
रितेपणाचा डंख
तु उचलून घ्यावे अलगद
गळून पडले पंख....
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
6/8/2021
No comments:
Post a Comment