पारिजाताच्या दारात
तुझा सुगंध सांडे
कोण दिले हाकारे
कुठे निघाले तांडे?
भिंत एक उभी
मधे तुझ्या माझ्या
खुणा तिच्यावर
सावलीच्या ताज्या
डोळ्याच्या डोहात
आठवकुळाचे पाणी
कोण झंकारते
आर्त पुका-याची गाणी
दुरदिशेला सोनकळी
एकाकीच उमले
कलत्या रातीवर
चांदण्याचे इमले
सांजगीताचे साजनी
स्वर रिते फोल
दुर देशीच्या ढगांना
तुझ्या आठवांची ओल
कुलीन रातीला लागे
चांदण्याचा डाग
चंद्र नभीचा धुंडाळे
तुझा सोनकांती माग
भिंती अल्याड मी
रेखाटले तुझे चित्र
आभाळाने घनव्याकुळ
दिले चांदण नक्षत्र
नक्षत्राच्या खाली
तुझ्या आभासाचा वारा
मी नभी पेरलेला
एक खुणेचा शुक्रतारा
घे पुका-याचा अदमास
दे ओली मुक हाक
रात टाक झळाळुन
सोड अंधाराचा धाक...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(27 ऑगस्ट 2021)
No comments:
Post a Comment