Tuesday, August 17, 2021

आभाळाचा पुर....

आभाळ का गरजे?
रात निजता दाराशी
पाऊस बसे एकला
गर्द पिंपळ पाराशी

दिवेलागणीच्या वेळी
तु गीत कोणते पेरले?
घन विझल्या अंधारात
कण विजेचे उरले

घन बरसे व्याकुळ
तुझ्या ओथंब दारात
भिज लागला पाउस
ओल्या एकांत पारात

हे ओले ओथंब क्षण
ढगी कोण अंबरले?
थंड हवेच्या झोताने
घनव्याकुळ हंबरले

मौन होई बोलके
तुझ्या बरसत्या वेळा
कोण हाकतो अंबरी
सरी पावसाचा मेळा

दे अंतरीच्या सरी
पाऊस भिजू दे
खोल ढगाच्या तळाला
थेंब चकाकी सजू दे

तुझ्या पावसाचे गाणे
माझ्या भरलेल्या नभी
कोसळत्या पावसात
तु ओल्या नजरेने उभी

आला सईचा पुकारा
ढग निघाले खुप दुर
माझ्या मनात ओथंबे
तुझ्या आभाळाचा पुर..
(Pr@t@p)
" रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
17/8/2021










No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...