Saturday, January 22, 2022

मुक्तीची कविता...

निजलो आज जरा मी
गवताच्या पावला पाशी
धुके उतरले अवनी
नयनात दवांच्या राशी

घेउन धुके जरासे
मी गाठली दरी
तेजस्वी मोरपंख दिसले
राधेच्या गोकुळ घरी

एकांताच्या आक्रोशाला
मी शब्द तारण ठेवी 
प्रतिक्षा पळाची मग
होते एक-एक ओवी

हा अवशेषरूपी राजवाडा
हा कुठला मरण शाप?
क्रुसावर पावन रक्त
धुवते परके पाप

हात कुणाचे उठले?
नभात भरली दुवा
मोराच्या पंखाला फुटला
तेजस्वी डोळा नवा

ही अश्वमेघी आठवण
अडवणे सोपे थोडे?
न संपणारे तप जणू 
वनवासाचे कोडे

मी परत फिरता मागे
दरीत घुमते हाक
हे आठवणीचे द्युत
एक चाल तरी राख...

सारे सोडून पिंपळ
मी बसतो त्याच्या खाली
आणी करतो जिव माझा
शब्दांच्या पुर्ण हवाली

भाव व्यक्त होता
हळुवार मुक्ती येते
त्या मुक्तीच्या क्षणाची 
मग नित्य कविता होते.....!
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(२३ जानेवारी २०२२)

Thursday, January 20, 2022

चंद्राचे दुःख भगवे...

चांद दमला रातीला
निजे पहाटेच्या कुशी
मन स्वप्नांचे धन
चांदण्याच्या फुलराशी

थंडीच्या चाहूलीतुन
येई ऊबेची हाक
निज डोळ्यांना वाटे
उजेडाचा धाक

मंद विझतो चांदवा
जणू जळे धुप
धुक्याला गहिरे 
येई चांदण्याचे रूप

अंधार चेतला असता
कंदिल हळवा जळे
डोळ्यात कुणाच्या साचे
निद्रेचे गंधीत तळे?

अंधारबनाच्या ठायी
चांदण झुंबर फुटते
चंद्राच्या काळजाखाली
स्वप्नचांदणी नटते

मनात गुंजे आणीक
भयव्याकुळी नाद
चंद्र तळ्यात शोधी
चांदण्याचे पडसाद 

एक विराणी उसनी
देई मजला रावा
दगडाचे अंतरंग करते
मुर्तीचा ओला धावा

वृक्षाची बहरवेळ
तम भासते निळे
सप्तर्षी चांदण्यातुन
अंधार निपचीत गळे

अंधाराच्या अंतरी
स्वप्न देते हाका
सकाळ सजवत विझतो
चंद्र चांदणीसखा

सांजरातीच्या दरम्यान 
चंद्र नव्याने उगवे
दिवसा गडद होते
चंद्राचे दुःख भगवे..
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(२१ जानेवारी २०२२)

Tuesday, January 18, 2022

स्वप्नआरास....

बर्फधुळीच्या शिखरावरती
दाटलेली कुंद हवा
सांजेच्या अबोल घडीला 
रातीची अंधूक दुवा

दुर निघाल्या पंखाना
हवाच देते हुल
विरहांकीत धुक्यावर
अलगद पडते फूल

निष्पर्ण झाडांवर 
बहर पेरतो फुलवा
धुक्यात बुडल्या गावांचा
पाखरांना सांजभुलवा

दिशात दाटे अंबर
निःशब्द हो अवकाश 
अंधारात वितळे
वाट घराची सावकाश 

दिवेलागणी वेळी 
दाटते गर्द धुके
गीत आळवतो रावा
एक आर्त मुके

नभात सजते चांदणे
चंद्रउदयाची वेळ 
धुक्यात झरते चांदणे
आठवणीचा खेळ 

प्रांजळाच्या आरशात 
दाटून येते सावली
मी चंद्र उजवत येतो
अंधाराच्या पाऊली

दोन अवकाशाचे तुकडे
एक चंद्र उगवतो
रातीचा अवघड पळ
चांदणीस तगवतो

लाघवी चांदणे उजळे
जणू दवात पारा
गंध तुझा उधळून 
होई संथ वारा

घनभारी अंधारातुन
मग चंद्र येतो भरास
मी नित्य चांदण्यातून
मांडतो स्वप्नआरास...

▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१९ जानेवारी २०२२)

Sunday, January 16, 2022

पुनव आग..

निःशब्द झाड उभे
थवे निघाले दुर
धुक्यास फुटले आता
व्याकुळ ओले सुर

शब्दाच्या ओझ्याखाली 
पंखाचे पसरून जाणे
धुक्यात बुडल्या वाटा
पक्षांनी विसरून जाणे

दिपस्तंभाच्या वरती
गडद धुके दाटते 
सागराच्या गर्द लाटातुन
खुण मागे सुटते

सागर होतो शांत
नाव स्तब्ध होते
सागरकिनारी रूजती
ओली पाखर गीते

दोन किना-या आत
सागर जोडतो धरती
गलबलीचे हलके पक्षी
उडती सागरावरती

हा सागर, हे पक्षी
या वाहत्या विराण लाटा
मी किना-या वरती
धुंडाळतो हरवल्या वाटा

रेतीच्या काळजावरती
रेखाटल्या पाऊलनक्षी
त्यांचे ठसे पेरत उडाले
दिगंतावरी पक्षी

आकाश बुडते सागरी
ठशांचा मिटतो माग
सागर जळतो लाटातुन 
विझवत पुनव आग

▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१७ जानेवारी २०२२)

Friday, January 14, 2022

पापण्यात चंद्र भिजतो...

या सांजबुडीच्या वेळी
आसमंत नटवावा
तु लक्ष दिव्याचा चांद
नभात पेटवावा

चंद्र रांगोळी होता
तु त्यात भरावा रंग
एकट रातीत पेरावा
तु चांदण्याचा संग

चंद्रभागी आस 
मनात तु पेरावी
अभंगाने नेमकी
ही आर्तता हेरावी

निघत्या पक्षाच्या या
परतत्या पाऊलखुणा
तु भारावा अवकाश
अंधारलेला सुना

या हवेच्या भिंती
त्यावरील गारवा नक्षी
तुझ्या दिशेच्या वाटेवर
रेंगाळती सांजपक्षी

नदीअंतरी छाया
पाण्यावर चंद्र सांडे
झुळझुळणा-या पृष्ठावर
आठवणीचे तांडे

झाडाच्या सावलीला
चंदेरी कसली छाया?
काठांची एकी होते
नदीशी भांडाया

हा बिलोरी चांद
रातीची ओंजळ भरतो
झरा अनामीक ओला
नदी अंतरी झुरतो

ही नदी,हा चांद
ही तेजाळलेली रात्र
काठांच्या तगमगीचे
हे आठवणींचे सत्र

दुर दिशेला अवकाश 
नदीत अलगद निजतो
नयनाचा काठ बंद
पापण्यात चंद्र भिजतो.....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१५ जानेवारी २०२२)

Thursday, January 13, 2022

अवचित पाऊसभास...

स्वप्नतळी पाऊस
ढग झाले बावरे
धरतीचे तृष्ण भोग
ढग मुक सावरे

पाखराचे गाव ओले
दुर एकटे तळे
बंद दाराआड एकट
पणती मंद जळे

बांधावर झाड हलते
वेलीस वाटते भय
ओल्या गावावर पसरे
आठवणीची सय

हा अवचीत थेंब ओला
मातीस अलिंगन देई
ढग वाहते पाणी
हवा होते भोई

मागून कसले धुके?
सारेच होई धुसर
स्पर्शाच्या कातळावर
जाणीवा मुक पसर

अवचीत पावसाचा
ढगी उत्सव भरतो
एक एकला पक्षी
फांदीवरती झुरतो

दुर झ-याचे वाहणे
रातीवर काळोख पसरे
थेंब वाहती पाऊस
ढगात ओथंब हसरे

या अज्ञाताच्या घटीकेला
तु येण्याची आस
माझ्या अवकाशाला
तुझा ओला पाऊसभास

या कुंद हवेला
उदासीचा एक गंध
दिवा जळतो प्रतिक्षेत
एकला.....मंद
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(१४ जानेवारी २०२२)



Wednesday, January 12, 2022

फिके आभास..

मी शोधत असता नित्य
या व्याकुळतेचे उत्तर 
हवेत दाटून येते नेमके
तुझ्या आठवणीचे अत्तर 

दरीत कसला नाद,
हे नदीस कसले हंबर?
ओंजळीतल्या चांदण्यात
अलगद उतरे अंबर

वाट कुठे निघाली?
धुक्यात बुडून दूर
गावावर दाटून येतो
आर्त व्याकुळ सुर

झाडांना धुके बाधते
धुक्यास झाड लागे
बंद असल्या डोळ्यात
स्वप्न उभे का जागे?

ही गंधाळली हवा
या धुक्यास तुझा आकार
पाखराच्या चोचीलाही
ये तुझाच सुक्ष्म पुकार...

वहीत उतरते इकडे
कवितेचे व्याकुळ घन
धुके शोधत असते
तुझे गंधीत आठवबन 

शब्दाच्या पोकळीला
तु दिलेला भाव
या निरंग धुक्याला
कुठले द्यावे नाव?

दुर दिसत्या धुक्याला
स्पर्श कसे व्हावे?
जो जो उतरता खोल
धुके पुढेच धावे

नयनास जरी दिसते
धुके असतो आभास
शब्दाच्या साथीने चालणारा 
हा दिशाहीन प्रवास...

कधीतरी ओंजळीत 
उतरून येईल धुके
शब्दांना येईल सुर
आभास होतील फिके....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१३ जानेवारी २०२२)

Tuesday, January 11, 2022

धुक्याचे गीत

ढग उभे दारात
रांगोळीत धुके
झुळुकीच्या आत
वाहे गीत मुके

सुर्य नसताना
रेंगाळतो दिस
धुक्याच्या काळजाला
प्रकाशाची आस

अंधाराला बोले
एक मुक काजवा
जाग्या झाल्या चांदण्या
चंद्र कोणी निजवा

दुरदेशी कुठली गीते
पिकात असे रूजले 
गाभा-यातील दिप
थकून मुक विझले

ही हवा कोणता बहर
मनी जोजवत असते
डोंगरी वाहती नदी
रान भिजवत असते

काळोख उठून निघतो
उजळत सारी घरे
नदीच्या अंतःकरणी 
प्रकाशाचे ओले झरे

धुक्यात बुडली घटीका
तम साचलेले
निघून गेले मोर
माळावर नाचलेले

हा पिसांचा पसारा
रानभर बासरी सांडलेली
पडवीत तशीच शिल्लक
भातुकली मांडलेली

दिवस उगवेल नवा
एक धुके घेवून खिन्न 
येईल हिच विराणी
घेवून शब्द भिन्न!

शब्दांची घेवून झोळी
फकिर चालत जाई
पावलांत विसावलेली
आठवांची मंद घाई....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१२ जानेवारी २०२२)

Sunday, January 9, 2022

अथांग....

मन व्याकुळाचे धन
बहरे आठवांचे बन
शब्दांच्या अवकाशी
सांज कवितेचे घन

दिस बुडतसे मंद
सांज होई कुंद
थबकल्या हवेला
झुळुकीचा गंध

मनी दाटे शब्द
यमकावरी लब्ध
धुके चितारते हळू
गझलेचे प्रारब्ध 

दिन हळू विझे
चंद्र ढगी सजे
चांदण्यात लकाकती
तुझी माझी गुजे

भारावते रान
पुकारत आण
झाड उचलते
पडलेले पान

दवतीचा टाक
कवितेची हाक
सांजेला येता तुझ्या 
आठवांची झाक

दुर निघे वारा
सुरांच्या निज धारा
दवात बुडलेला 
मी पाही ध्रूवतारा

रातीचे सारे रंग
चांदण्याचा संग
चांदभुलव्यात 
मन होते दंग

किती द्याव्या हाका
शब्द होई मुका
अभंग बुडवितो
इंद्रायणी तुका

तरी वाट पाही
उरतसे काही
बासरीच्या आत
कृष्ण अथांग वाही...
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(९ जानेवारी २०२२)

Tuesday, January 4, 2022

सुगंधी बहर...

लाटासवे हे उचंबळ
किनारा समीप नाही
ही सागरी हवा अशी
आर्तता अमाप वाही

तारकांनी स्पर्शावे पाताळ
धरती विलीन व्हावी
वा-याने वाहिली फुले
ओंजळीत कुलीन व्हावी

हे मयुरपंखी आभास
रानास नुसता गहिवर
तृणाच्या नाजूक तनावर
कोण शिंपावे दहिवर?

हे प्रार्थनेचे सुर आर्त
दवात खोल भिजावे
फांदीवर बहराने
अलवार सजावे

ही पाखरवेळ अशी
ढगास देई हाका
घरट्याने माफ कराव्या
पंखाच्या सैल चुका

ही तारकी कुजबूज
फुले होता जागे
राधेच्या पदरात
सजती कृष्णधागे

जिव असा की खोल
असा जडून जावा
दवात फुल सुगंधी
बहर घडून यावा...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(२ जानेवारी २०२२)












 

शब्दांची आशा

असे भेटावेत शब्द
जणू देव भेटावा
मनातल्या अबोलास
काव्य सुर फुटावा

व्याकूळ सांज घराला
उजळते दिवे लागणी
दारात हुरहुर उभी
तुला शब्दमागणी

दे पसाभर शब्द!
भरून टाक झोळी
अंधाराच्या काळजावर
रेखू दे रंगीत ओळी

अज्ञाताच्या आडून
मी गीत कुणाचे रचतो?
शब्दांना आणीक माझ्या
कंठ तुझा का फुटतो?

चंद्र उगवता नभी
चांदणे असे का पेटे?
मी गझल अनामिक लिही
घेवून आभाळ छोटे

क्षितीज गोठल्या वेळी
पक्षी कुठे उडती?
शब्द असे काहूरी
पंखावर त्यांच्या जडती

दुर निघाले शब्द
घेवून तुझी दिशा
ओंजळीत तुझ्या रूजावी
ही शब्दांची व्याकुळ आशा...
(Pr@t@p)
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(५ जानेवारी २०२२)




Saturday, January 1, 2022

घनव्याकुळी धुके....

घनव्याकूळ शब्दबनाचे
धुके साचले नभी
धुसर धुक्याच्या पटलावर
आर्त कविता उभी

राधेस जो मिळाला
तो अप्राप्य वेणू सूर
धुसर मंद धुक्याला
ये बासरीचा महापूर

विरळ जाहल्या वेळी 
या कसल्या गाठीभेटी?
सुर्यास्त गर्भस्थ होई
चंद्रोदयाच्या पोटी

चाफ्याच्या फांदीवर
हे दुःख कुणाचे लगडे?
मुठीत झाकले अंधार
तारकात पडती उघडे

हे थबकते निनाद!
ही कसली मंद घाई
धुक्यात पावन होते
माझ्या शब्दांची वनराई

कृष्णकुळाच्या सुरात
राधेचा निनाद कानी
कालियाचे जहर उतरते
राधेच्या डोळचे पाणी

सांज गाय होते
निघते गोठ्या कडे
कासेत साचवत असते
वासराचे हंबर तडे

ही शब्दाची ओढ
हे कवितेचे हंबर
मी उभा माळरानी 
वर तुझे तारका अंबर

मी तुटला तारा घेतो
शब्दांना जोडताना
मी देठ फुलांचा होतो
फांदी अलगद सोडताना

अशा किती जपल्या राई
अशी किती कोसळली फुले
मी धुक्यात शोधत राहतो
तुझ्या आठवांचे चांदणझूले...
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१ जानेवारी २०२२)


राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...