मन व्याकुळाचे धन
बहरे आठवांचे बन
शब्दांच्या अवकाशी
सांज कवितेचे घन
दिस बुडतसे मंद
सांज होई कुंद
थबकल्या हवेला
झुळुकीचा गंध
मनी दाटे शब्द
यमकावरी लब्ध
धुके चितारते हळू
गझलेचे प्रारब्ध
दिन हळू विझे
चंद्र ढगी सजे
चांदण्यात लकाकती
तुझी माझी गुजे
भारावते रान
पुकारत आण
झाड उचलते
पडलेले पान
दवतीचा टाक
कवितेची हाक
सांजेला येता तुझ्या
आठवांची झाक
दुर निघे वारा
सुरांच्या निज धारा
दवात बुडलेला
मी पाही ध्रूवतारा
रातीचे सारे रंग
चांदण्याचा संग
चांदभुलव्यात
मन होते दंग
किती द्याव्या हाका
शब्द होई मुका
अभंग बुडवितो
इंद्रायणी तुका
तरी वाट पाही
उरतसे काही
बासरीच्या आत
कृष्ण अथांग वाही...
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(९ जानेवारी २०२२)
No comments:
Post a Comment