Saturday, January 1, 2022

घनव्याकुळी धुके....

घनव्याकूळ शब्दबनाचे
धुके साचले नभी
धुसर धुक्याच्या पटलावर
आर्त कविता उभी

राधेस जो मिळाला
तो अप्राप्य वेणू सूर
धुसर मंद धुक्याला
ये बासरीचा महापूर

विरळ जाहल्या वेळी 
या कसल्या गाठीभेटी?
सुर्यास्त गर्भस्थ होई
चंद्रोदयाच्या पोटी

चाफ्याच्या फांदीवर
हे दुःख कुणाचे लगडे?
मुठीत झाकले अंधार
तारकात पडती उघडे

हे थबकते निनाद!
ही कसली मंद घाई
धुक्यात पावन होते
माझ्या शब्दांची वनराई

कृष्णकुळाच्या सुरात
राधेचा निनाद कानी
कालियाचे जहर उतरते
राधेच्या डोळचे पाणी

सांज गाय होते
निघते गोठ्या कडे
कासेत साचवत असते
वासराचे हंबर तडे

ही शब्दाची ओढ
हे कवितेचे हंबर
मी उभा माळरानी 
वर तुझे तारका अंबर

मी तुटला तारा घेतो
शब्दांना जोडताना
मी देठ फुलांचा होतो
फांदी अलगद सोडताना

अशा किती जपल्या राई
अशी किती कोसळली फुले
मी धुक्यात शोधत राहतो
तुझ्या आठवांचे चांदणझूले...
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१ जानेवारी २०२२)


No comments:

Post a Comment

भूपाळी

ही वेळ अशी का रिती? चांद नभात ढळतो हरणांचा रथ कुठे हा अज्ञात दिशेला वळतो राजकन्या कुठली वेडी शोधण्या कुणाला निघते? वैभव चांदण्याचे  निळे निळ...