Wednesday, January 12, 2022

फिके आभास..

मी शोधत असता नित्य
या व्याकुळतेचे उत्तर 
हवेत दाटून येते नेमके
तुझ्या आठवणीचे अत्तर 

दरीत कसला नाद,
हे नदीस कसले हंबर?
ओंजळीतल्या चांदण्यात
अलगद उतरे अंबर

वाट कुठे निघाली?
धुक्यात बुडून दूर
गावावर दाटून येतो
आर्त व्याकुळ सुर

झाडांना धुके बाधते
धुक्यास झाड लागे
बंद असल्या डोळ्यात
स्वप्न उभे का जागे?

ही गंधाळली हवा
या धुक्यास तुझा आकार
पाखराच्या चोचीलाही
ये तुझाच सुक्ष्म पुकार...

वहीत उतरते इकडे
कवितेचे व्याकुळ घन
धुके शोधत असते
तुझे गंधीत आठवबन 

शब्दाच्या पोकळीला
तु दिलेला भाव
या निरंग धुक्याला
कुठले द्यावे नाव?

दुर दिसत्या धुक्याला
स्पर्श कसे व्हावे?
जो जो उतरता खोल
धुके पुढेच धावे

नयनास जरी दिसते
धुके असतो आभास
शब्दाच्या साथीने चालणारा 
हा दिशाहीन प्रवास...

कधीतरी ओंजळीत 
उतरून येईल धुके
शब्दांना येईल सुर
आभास होतील फिके....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१३ जानेवारी २०२२)

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...