बर्फधुळीच्या शिखरावरती
दाटलेली कुंद हवा
सांजेच्या अबोल घडीला
रातीची अंधूक दुवा
दुर निघाल्या पंखाना
हवाच देते हुल
विरहांकीत धुक्यावर
अलगद पडते फूल
निष्पर्ण झाडांवर
बहर पेरतो फुलवा
धुक्यात बुडल्या गावांचा
पाखरांना सांजभुलवा
दिशात दाटे अंबर
निःशब्द हो अवकाश
अंधारात वितळे
वाट घराची सावकाश
दिवेलागणी वेळी
दाटते गर्द धुके
गीत आळवतो रावा
एक आर्त मुके
नभात सजते चांदणे
चंद्रउदयाची वेळ
धुक्यात झरते चांदणे
आठवणीचा खेळ
प्रांजळाच्या आरशात
दाटून येते सावली
मी चंद्र उजवत येतो
अंधाराच्या पाऊली
दोन अवकाशाचे तुकडे
एक चंद्र उगवतो
रातीचा अवघड पळ
चांदणीस तगवतो
लाघवी चांदणे उजळे
जणू दवात पारा
गंध तुझा उधळून
होई संथ वारा
घनभारी अंधारातुन
मग चंद्र येतो भरास
मी नित्य चांदण्यातून
मांडतो स्वप्नआरास...
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com
(१९ जानेवारी २०२२)
No comments:
Post a Comment