Friday, January 14, 2022

पापण्यात चंद्र भिजतो...

या सांजबुडीच्या वेळी
आसमंत नटवावा
तु लक्ष दिव्याचा चांद
नभात पेटवावा

चंद्र रांगोळी होता
तु त्यात भरावा रंग
एकट रातीत पेरावा
तु चांदण्याचा संग

चंद्रभागी आस 
मनात तु पेरावी
अभंगाने नेमकी
ही आर्तता हेरावी

निघत्या पक्षाच्या या
परतत्या पाऊलखुणा
तु भारावा अवकाश
अंधारलेला सुना

या हवेच्या भिंती
त्यावरील गारवा नक्षी
तुझ्या दिशेच्या वाटेवर
रेंगाळती सांजपक्षी

नदीअंतरी छाया
पाण्यावर चंद्र सांडे
झुळझुळणा-या पृष्ठावर
आठवणीचे तांडे

झाडाच्या सावलीला
चंदेरी कसली छाया?
काठांची एकी होते
नदीशी भांडाया

हा बिलोरी चांद
रातीची ओंजळ भरतो
झरा अनामीक ओला
नदी अंतरी झुरतो

ही नदी,हा चांद
ही तेजाळलेली रात्र
काठांच्या तगमगीचे
हे आठवणींचे सत्र

दुर दिशेला अवकाश 
नदीत अलगद निजतो
नयनाचा काठ बंद
पापण्यात चंद्र भिजतो.....
▪ (Pr@t@p)▪
"रचनापर्व "
www.prataprachana.blogspot.com 
(१५ जानेवारी २०२२)

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...