एकांत आतला पेटतो
ऊन हळू निवताना
मी मोहरुन रंगीतगर्द
भास तुझे शिवताना
ओलांडून किरणे ढग हा
निघे निशेच्या गावा
राधेच्या काळीजहरिणी
निघती शोधित पावा
हतबल होते हुरहुर
डोहात उजळते पाणी
काळीज व्याकुळ होते
हृदयात उमलता गाणी
रंग सांडून रवी निघतो
धरतीच्या ओटीपोटी
सांज क्षणाची होते
काळजा एवढी मोठी
कल तुझ्या येण्याचे
पायरव का अडतो?
आवाज तुझा गं सखे!
हृदयात बघ धडधडतो
या स्पंदबाव-या हाकांचे
उत्सव सांज समया
एकांत मिठीला माझ्या
आठवांची तुझ्या किमया!
("やraτa প")
www.prataprachana.blogspot.com
१.१०.२०२३
















