Tuesday, September 12, 2023

फुलगंधी श्वास


रात जळते उशाला
वात धीमी धीमी झरे
चांद जागा माझा सखा
क्लांत निजलेली घरे

श्वास संथावले सखे
हवा बेताने वाहते
खिडकीच्या गवाक्षाने
कोण आकाश पाहते?

दुर गावच्या पल्याड
हिंडे रात पक्षी
दुःख अनाथ गं माझे
बिलगते तुझ्या वक्षी

निज देशील का त्याला?
किती जागले ते राती
चांद उजळू दे नभी
मंदावू दे फुलवाती

बोलेल तुझ्याशी
ते अबोल्याची भाषा
वेदना तयाची
निघेल दुरदेशा

जोजव तु त्याला
पुरव तु आस
लयीत चालू दे
तुझा फुलगंधी श्वास...... 

                          ("やraτa প")                           
www.prataprachana.blogspot.com
१३.९.२०२३ 

  

 


  

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...