एखाद दिव्य निश्वास...!
उगवत्या सांजेस शहारे
ढगात रूजल्या रंगावर
उमलत्या रातीचे पहारे
चांदण्याचे ओहोळ
पाताळमुलुख खणती
अंधाराच्या गाभा-यात
चंद्र लावतो पणती
मावळतीच्या ढगांचा
पाऊस कोरडा रंगीत
विझत्या सुर्याच्या अंतरी
इंद्रधनूचे संगीत
गलबल्याच्या गिताचे
शब्द उगवून येती
कवितेच्या काळजाला
भावनांचे मोती
मी चांद धुळीत पेरी
माती ढगास भिडते
नख कुणाचे मनोहर
बहर कोवळा खुडते?
सुके चांदणे नभी
ढगात ओल दाटे
मी पेरत असतो बागा
जोजवीत गुलाब काटे
काटे फुले होतात
चांद उमलतो रानी
चांदण्याचे बहर गाती
श्रावणाची गाणी
मी करत असतो पेरा
तुझ्या स्वप्न फुलो-याची आस
श्रावण आणतो पालवसरी
ते उमलण्या खास
आठव! गतवेळचे फुलेही
तुच कापले होते
जेंव्हा विश्वासाने ते
तुझ्या ओंजळीत झोपले होते.....
मी पेरा सोडत नाही
तु फुलांचे बहर
नित्य सांजवेळी येतो
कापणीचा प्रहर.....!
Pr@t@p
" रचनापर्व "
1/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com
No comments:
Post a Comment