Monday, August 17, 2020

काफिले उठत नाहीत.......

(काफिले उठत नाहीत ..........)

हवेस द्यावा सुगंध म्हणून, फुले लुटत नाहीत
सुटून जातील म्हणता मनाचे, कोडे सुटत नाहीत

ही रोखुन धरली हिरवळ , जात्या पावलांचे बहर
फांद्यावरील फुलेही आता, उमलून तुटत नाहीत

वाजेल वेणु आकांती , पैंजणे व्याकुळ असती
असुनही लय दोघांची ,ते यमुनेवर भेटत नाहीत

चांदणेही व्याकुळ असते, असते आभाळ सुंदर
तरीही चांदण्याला उगवतीचे, बहर फुटत नाहीत

निश्चल झाल्या वाटा , माळही रिता असतो
निघण्यास पावले आता, उंब-याशी झटत नाहीत

मुक्या आर्जवांची गर्दी , कवितेला आस ओली
पाहून तिव्रता भावनेची , अलबत् शब्दही खेटत नाहीत

होईल तनुगंधाशी तुलना, होतील श्वास बावरे
पाहून पर्व पानगळीचे , आता फुलेही नटत नाहीत

श्वासांदरम्यानच्या पोकळीत, तुझ्या आसक्तीची राहुटी
येवो कितीही हाकारे, तुझे काफिले उठत नाहीत.....!

Pr@t@p
" रचनापर्व "
18/8/2020
BLOG#prataprachana.blogspot.com





No comments:

Post a Comment

मुक्तीसंगर!

तूझ्या ओंजळीने भिमा तू आम्हा दिलास सागर महाडाच्या तळ्यातून  तू चेतवला जागर! तूझ्या ओंजळीचे आजही आम्ही पितो रे पाणी पिढ्या हूरूपाने गाती तूझ...